कामगार व उद्योजकांच्या समस्यांसाठी २४ तास हेल्पलाईन सेवा सुरू
मुंबई, दि. १७ : जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रातील कामगार आणि उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणींचे त्वरित निराकरण करण्यासाठी कामगार आयुक्तालयामार्फत विशेष हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून संबंधित घटकांना आवश्यक मार्गदर्शन आणि सहाय्य उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.
कामगार आयुक्तालय, कामगार भवन, ब्लॉक – ई, सी-२०, वांद्रे – कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई येथे ही हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली असून ०२२-२६५७२९२५ हा संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही सेवा चोवीस तास सुरू राहणार असल्याने कोणत्याही वेळी कामगार आणि उद्योजकांना त्यांच्या समस्यांबाबत संपर्क साधता येणार आहे.
सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम उद्योग, व्यापार आणि रोजगार क्षेत्रावर होत असल्याने विविध प्रकारच्या अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर तक्रारींचे तत्काळ निराकरण आणि योग्य समन्वय साधण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी कामगार आणि उद्योजकांना आवाहन केले आहे की, त्यांच्या अडचणी, तक्रारी किंवा शंका याबाबत हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, जेणेकरून संबंधित यंत्रणांकडून आवश्यक ती मदत वेळेत मिळू शकेल.
