गडचिरोलीतील जल प्रदूषण करणाऱ्या लॉईड्स स्टील कंपनी विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र
मुंबई/गडचिरोली, दि. १४: कधीकाळी नक्षलवादासाठी कुप्रसिद्ध असलेला गडचिरोली जिल्हा आता लोह खनिज उत्खननामुळे उद्भवणाऱ्या प्रदूषणामुळे चर्चेत आला आहे. जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागडच्या डोंगरात लॉईड्स स्टील कंपनीचे Lloyds Metals Steel लोहखनिज उत्खनन चालू आहे. या उत्खननामुळे या परिसरातील नद्या, पाण्याचे इतर नैसर्गिक स्रोत तसेच शेतजमिनी प्रदूषित झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. लोह खनिज उत्खनना दरम्यान मोठ्या प्रमाणात बॉक्साईटयुक्त लाल धूळ निर्माण होत असून ती थेट श्वसनावाटे लोकांच्या शरीरात जात आहेच सोबतीला ती नदी-ओढ्यांमध्ये मिसळली जात आहे. ज्यामुळे नदीमध्ये दलदल, चिखल तयार होत असून या चिखलात अडकून अनेक गुरे मेली असून जालीय जीवनालाही धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात गडचिरोली येथील सामाजिक कार्यकर्ते, माध्यमं मागील अनेक दिवसांपासून प्रशासनाचे विशेषतः प्रदूषण नियंत्रण मंडळाचे लक्ष वेधत आहेत. परंतु, त्यांना अपेक्षित प्रतिसाद लाभत नाहीये. अशातच आता या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाने लक्ष घातलं आहे. काल दिनांक १३ एप्रिल रोजी शिवसेना ठाकरे गटाचे गडचिरोली जिल्हा संपर्कप्रमुख महेश केदारी यांनी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पत्राद्वारे या विषयाकडे लक्ष वेधलं होतं. तर, आज दि. १४ एप्रिल रोजी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक खरमरीत पत्र लिहीत लॉईड्स स्टील कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आपल्या दोन पानी पत्राची सुरुवात करताना मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्देशून खा. संजय राऊत म्हणतात, “एक गंभीर विषय आपल्यासमोर मांडत आहे.
सरकारने बेफाम पद्धतीने खाण उद्योगाला सवलती व परवाने दिले आहेत. हे खाण मालक बेबंद पद्धतीने पर्यावरण, शेतकरी, सुपीक जमीन, पाण्याच्या स्रोतांचे नुकसान करत आहेत. एटापल्ली तालुक्यातील सुरजागडच्या डोंगरात लॉईड्स स्टील कंपनीचे खाणकाम धोकादायक बनले आहे. या स्टील कंपनीच्या लोखंड खाणीमधून उपसलेली लाल माती, खनिज कचरा गावातील ओढे, नदी, पाण्याचे स्रोत व पिकाऊ जमिनीत मिसळत आहे. त्याचे भयंकर परिणाम पर्यावरण, मानवी तसेच प्राणी जीवनावर होत आहेत.
१. या भागातील ओढ्यांचे पाणी पूर्णपणे गढूळ, लाल रंगाचे झाले आहे.
२. या भागात खनिजमिश्रित चिखल झाला आहे. उन्हाळ्यात गुरे, पाणी पिण्यासाठी ओढ्याकडे जाताना चिखलात रुतून अडकतात. त्यात आतापर्यंत १० गुरे मृत्यूमुखी पडली. त्यात ७ गोमाता आहे.
३. प्रदूषणामुळे ओढ्यातील मासे, बेडूक व इतर जलचर पूर्णपणे नष्ट झाले आहेत.
४. शेतकऱ्यांच्या धानाच्या पिकावर यामुळे संकट आले व मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
पुढे मुख्यमंत्र्यांवर टीकेचे आसूड ओढताना ते म्हणतात, “हे खाण क्षेत्र नक्षलप्रभावित असल्याचे म्हटले जाते व येथे उद्योगधंद्यास अडथळा ठरलेला “नक्षलवाद” आपण संपल्याचे श्रेय घेत असता, पण नक्षलवाद संपला तरी उद्योग-विकासाच्या नावाखाली शेतकरी, तसेच निसर्गावर नव्याने अत्याचार सुरू झाला आहे. शेतकऱ्यांचा आवाज पूर्णपणे दडपला जात आहे. राज्याचे पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा प्रशासन याच भ्रष्टाचाराच्या चिखलात रुतले असल्याने कोणत्याही तक्रारीची दखल घेतली जात नाही. माझी आपणाकडे मागणी आहे –
१. पर्यावरण तज्ज्ञांची समिती तातडीने या जागेवर पाठवावी व लोकांच्या तक्रारी ऐकाव्यात.
२. लाईड्स कंपनीवर कठोर कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करावा.
३. मृत गुरांच्या मालकांना, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना खाण मालकांकडून नुकसानभरपाई द्यावी.
पत्राच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत ते म्हणतात, देवेंद्रजी, विदर्भातील विशिष्ट भागात अशा खाण उद्योगांची मनमानी सुरू आहे. पर्यावरणाबाबतचे सर्व नियम मोडून भ्रष्टाचाराला उत्तेजन देऊन त्यांचे काम सुरू आहे. या उद्योगांकडून राजकीय पक्षांना मिळत असलेल्या पैशांचे आकडे धक्कादायक आहेत. “न खाऊंगा न खाने दूंगा” या पंतप्रधान मोदींच्या धोरणास तडे देणारे हे वर्तन आहे.
गावकरी, शेतकरी यांच्या शुद्ध पाण्याचा हक्क मारणाऱ्या अशा उद्योगांना धडा शिकवावा व एकंदरित हे प्रकरण आपण गांभीर्याने घ्यावे ही विनंती.
कळावे,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे आता खा. संजय राऊत यांच्या या पत्राची दखल घेत मुख्यमंत्री लॉईड्स स्टील कंपनीवर काय कारवाई करतात हे पाहणे लक्षणीय ठरेल.

