“कोयना दौलत डोंगरी महोत्सव काळाची गरज” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सातारा, दि. ६ : सातारा जिल्ह्याच्या निसर्गसंपन्न आणि ऐतिहासिक वैशिष्ट्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी पर्यटनविकासावर भर देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कोयना दौलत डोंगरी महोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. या महोत्सवाच्या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांना सांस्कृतिक आणि पर्यटनाच्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सांगता समारंभादरम्यान कोयना नदीवरील सांगवड येथील पूल, दौलतनगर येथील शिवदौलत स्टेडियम, लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक परिसरातील संगीत कारंजे व लेझर शो तसेच स्वर्गीय शिवाजीराव देसाई स्मृतिभवन यांचे उद्घाटन करण्यात आले. याशिवाय पापर्डे येथे जलपर्यटन केंद्राचेही दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, प्रभारी पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, महाबळेश्वरवरील पर्यटकांचा वाढता ताण लक्षात घेऊन ‘नवीन महाबळेश्वर’ विकसित करण्याचे नियोजन सुरू आहे. यामुळे पर्यटकांना पर्यायी ठिकाण उपलब्ध होईल तसेच स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. कोयना बॅकवॉटर परिसरात डिसेंबर-जानेवारी महिन्यात महोत्सव आयोजित करून त्याला जागतिक दर्जा देण्याचा शासनाचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
डोंगरी भागातील नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात भजन, कीर्तन, लावणी, पोवाडा, खाद्यजत्रा यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच पॅराग्लायडिंग, सी-प्लेन राईड, स्कूबा डायव्हिंग यांसारख्या साहसी उपक्रमांनाही चालना देण्यात आली. यामुळे स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळण्यासोबत पर्यटनाला चालना मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पर्यटन विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यावर शासन भर देत असून, वासोटा आणि इतर पर्यटनस्थळांसाठी रोपवे प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. कोयना नदीवर तापोळा आणि आपटी येथे मोठ्या पुलांचे बांधकाम सुरू असून, या प्रकल्पांमुळे दुर्गम भागातील सुमारे १०५ गावे एकमेकांशी जोडली जाणार आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांच्यातील संपर्क अधिक सुलभ होईल, असेही त्यांनी सांगितले.
शेतकरी आणि युवकांच्या विकासासाठी क्लस्टर शेती उपक्रम राबविण्यात येत असून, कमी जमीनधारक शेतकऱ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बांबू लागवडीला चालना देण्यासाठी त्याचा ‘गवत’ वर्गात समावेश करण्यात आला असून, मनरेगा योजनेअंतर्गत अनुदान दिले जात आहे. सातारा जिल्ह्यात सुमारे ८,००० एकर क्षेत्रावर बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
तसेच बोंडारवाडी धरण प्रकल्पाला गती देण्यात येणार असून, सातारा एमआयडीसीमध्ये उद्योगवाढीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना प्राधान्याने राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना कोणत्याही परिस्थितीत सुरूच राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. ई-केवायसीसाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले. ‘नमो शेतकरी सन्मान योजने’द्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी १२,००० रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे नमूद करत पुढील वर्षापासून महोत्सवाचा कालावधी वाढविण्याची मागणी होत असल्याचे सांगितले. महोत्सवात कृषी प्रदर्शन, बचत गटांचे स्टॉल, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास स्थानिक नागरिक, अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी यशराज देसाई यांनी आभार मानले.
