योजनेचा कालावधी आज रात्री १२ वाजेपर्यंतच मर्यादित
नवी मुंबई, दि. ३१ : नवी मुंबई महानगरपालिकेकडून मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेचा लाभ घेण्याची आज, दि. ३१ मार्च २०२६ हीच अंतिम मुदत असून, नागरिकांनी तातडीने थकबाकी भरून ५० टक्के विलंब शास्ती माफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
महानगरपालिकेच्या माहितीनुसार, या योजनेचा कालावधी आज रात्री १२ वाजेपर्यंतच मर्यादित असून, त्यानंतर थकीत करावरील विलंब शास्तीवरील कोणतीही सवलत लागू राहणार नाही. त्यामुळे ही संधी गमावल्यास नागरिकांना संपूर्ण शास्तीसह कर भरावा लागणार आहे.
कर भरण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध
नागरिकांना सुलभतेने कर भरण्यासाठी महानगरपालिकेकडून ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
- अधिकृत संकेतस्थळाद्वारे घरबसल्या सुरक्षित कर भरणा
- व्हॉट्सअॅप चॅटबॉट क्रमांक ८२९१९२०५०४ द्वारे सुविधा
- शहरातील विविध कर संकलन केंद्रांवर प्रत्यक्ष जाऊन भरणा
ऑनलाईन सेवा २४x७ सुरू असल्याने कोणत्याही वेळी कर भरता येत असून, विशेषतः नोकरदार वर्गासाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
सर्व प्रकारच्या मालमत्तांना लागू सवलत
अभय योजनेअंतर्गत
- निवासी
- बिगरनिवासी
- औद्योगिक
- मोकळ्या जागा
या सर्व प्रकारच्या मालमत्तांवरील थकीत कर एकरकमी भरल्यास विलंब शास्तीवर ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. मात्र ही सवलत केवळ आजच्या दिवसापुरतीच लागू आहे.
शेवटच्या दिवशी वाढीव वेळ
नागरिकांच्या सोयीसाठी आज कर संकलन केंद्रे रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे उशिरापर्यंत कर भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्वरित प्रतिसादाचे आवाहन
महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे की, अजूनही ज्यांनी मालमत्ता कर भरलेला नाही, त्यांनी विलंब न करता आजच ऑनलाईन किंवा ऑफलाईन माध्यमातून थकबाकी भरावी आणि ‘थकबाकीदार’ हा शिक्का कायमचा दूर करावा.
५० टक्के शास्ती माफीचा लाभ घेण्याची हीच अखेरची संधी असल्याने नागरिकांनी त्वरित प्रतिसाद देऊन आर्थिक सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
