तपास बारामती ग्रामीण पोलिसांकडे वर्ग
मुंबई/बेंगळुरू, दि. २५ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला नवे वळण मिळाले असून कर्नाटकातील बेंगळुरू येथे ‘झिरो एफआयआर’ दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्यानंतर हा तपास महाराष्ट्रातील बारामती ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात या प्रकरणात गुन्हा नोंदवला जात नसल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी २३ मार्च रोजी कर्नाटकातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ‘झिरो एफआयआर’च्या माध्यमातून नोंद झाल्यानंतर संबंधित प्रकरण पुढील तपासासाठी महाराष्ट्र पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आले. याबाबत कर्नाटक पोलिसांचे आभार मानत, आता या तपासाची जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांवर असून त्याची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
बेंगळुरूमध्ये नोंदवलेल्या या ‘झिरो एफआयआर’मध्ये विमान अपघात हा केवळ तांत्रिक बिघाड नसून संभाव्य गुन्हेगारी कटाचा भाग असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेअंतर्गत खून, निष्काळजीपणामुळे मृत्यू, गुन्हेगारी कट, पुरावे नष्ट करणे तसेच बनावट कागदपत्रे तयार करणे यांसारख्या विविध गंभीर कलमांचा समावेश या तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, विमानाच्या सुरक्षिततेसंदर्भातील नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः उड्डाण आणि लँडिंगच्या वेळी आवश्यक दृश्यता मर्यादा पूर्ण नसतानाही परवानगी देण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच विमानाच्या वापराच्या तासांमध्ये अधिकृत नोंदी आणि प्रत्यक्ष वापर यामध्ये विसंगती असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, अपघातापूर्वी पायलटमध्ये शेवटच्या क्षणी बदल करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून संबंधित पायलटच्या पूर्वीच्या शिस्तभंगाच्या नोंदींबाबतही शंका व्यक्त करण्यात आली आहे. या सर्व बाबींचा एकत्रित विचार करता, हा अपघात केवळ नैसर्गिक दुर्घटना नसून गंभीर निष्काळजीपणा किंवा नियोजित गैरप्रकारामुळे घडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे तक्रारीत म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर संपूर्ण घटनेचा सखोल आणि निष्पक्ष गुन्हेगारी तपास व्हावा, संबंधित जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, तसेच पीडितांना न्याय मिळावा, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरही मोठी खळबळ उडाली असून, तपासाच्या पुढील टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
