नवी मुंबईत ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाची जल्लोषात सुरुवात; वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये ‘मिनी महाराष्ट्र’ साकार
मुंबई, दि. २५ : महिला बचत गटांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणारे आणि ग्रामीण ते शहरी असा सांस्कृतिक व व्यावसायिक सेतू निर्माण करणारे ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शन नवी मुंबईतील वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये मोठ्या उत्साहात सुरू झाले आहे. विविध जिल्ह्यांतील तसेच राज्याबाहेरील महिलांच्या सहभागामुळे या ठिकाणी अक्षरशः ‘मिनी महाराष्ट्र’ अवतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
हे प्रदर्शन ३ एप्रिलपर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार असून प्रवेश विनामूल्य आहे. वातानुकूलित सुविधा, सुव्यवस्थित स्टॉल्स आणि विविध उत्पादनांचा मोठा खजिना यामुळे नागरिकांचा प्रतिसादही उत्स्फूर्त मिळत आहे.
उद्घाटन सोहळ्यास अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, नवी मुंबईच्या महापौर सुजाता सुरज पाटील, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, मुख्य परिचालन अधिकारी निखिलकुमार ओसवाल, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सलूजा सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर सुजाता पाटील यांनी सांगितले की, महिला आज प्रत्येक क्षेत्रात आपली छाप पाडत आहेत. अशा प्रदर्शनांमुळे ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी मोठी बाजारपेठ मिळते आणि त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात. नवी मुंबई महापालिका अशा उपक्रमांना पूर्ण सहकार्य देत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी महिलांच्या उद्योगशीलतेचे कौतुक करताना सांगितले की, महामंडळाच्या माध्यमातून महिलांना अधिकाधिक आर्थिक पाठबळ देण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. ‘सरस’ प्रदर्शनातून होणारी उलाढाल सातत्याने वाढत असून, भविष्यात विविध महामंडळांच्या समन्वयातून कर्ज वितरणाची व्यापक योजना राबविण्याचा विचार सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनी ‘महालक्ष्मी सरस’ हा महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रभावी मंच ठरत असल्याचे सांगितले. राज्यातील सुमारे एक कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, सध्या सुमारे ४२०० हून अधिक उत्पादने ऑनलाइन व्यासपीठावर उपलब्ध आहेत. उत्पादनांच्या दर्जात, पॅकेजिंगमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विपणनातही लक्षणीय प्रगती झाल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रदर्शनात एकूण ४९० स्टॉल्स उभारण्यात आले असून, त्यापैकी सुमारे ४२० स्टॉल्समध्ये बचत गट, सूक्ष्म उद्योग आणि नवउद्योजकांच्या विविध उत्पादनांचा समावेश आहे. उर्वरित ७० स्टॉल्समध्ये देशभरातील विविध खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. हस्तकला, हातमागावरील कापड, घरगुती मसाले, सजावटीच्या वस्तू, दैनंदिन वापरातील उत्पादने अशा विविध वस्तू येथे उपलब्ध आहेत.
विविध राज्यांतील अस्सल चवींची मेजवानी, सांस्कृतिक वैविध्य आणि महिलांच्या कष्टातून साकारलेली उत्पादने यामुळे ‘महालक्ष्मी सरस’ हे प्रदर्शन केवळ खरेदीपुरते मर्यादित न राहता एक अनुभवात्मक उत्सव ठरत आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिलांच्या या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
