“उद्योजकता विकास प्रशिक्षणातून महिलांचे सक्षमीकरण” – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सांगली, दि. २० : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण हा प्रभावी मार्ग ठरत असून, महिलांनी स्वावलंबी होऊन कुटुंबासह समाजाच्या प्रगतीत मोलाचे योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्य मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. सांगलीतील खरे मंगल कार्यालय येथे आयोजित महिला उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या कार्यक्रमास जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील, उद्योग अधिकारी टी. एन. खांडेकर, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे आलोक मिश्रा, प्रकल्प अधिकारी किरण बनसोडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. जिल्हाभरातील प्रशिक्षणार्थी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
“महिला सक्षम तर कुटुंब सक्षम”
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “महिला शिकली तर ती सक्षम होते. महिला सक्षम असेल तर कुटुंब सक्षम होते आणि कुटुंब सक्षम असेल तर देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते.” महिलांनी केवळ नोकरीपुरते मर्यादित न राहता उद्योजकतेकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.
महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे उद्योग उभारण्यासाठी पुढे यावे, असे सांगत त्यांनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून व्यवसाय उभारणी, कर्जसुविधा, आर्थिक नियोजन, विपणन कौशल्ये याबाबत मार्गदर्शन देणे आवश्यक असल्याचे नमूद केले.
जिल्हा वार्षिक योजनेतून १ कोटी ६२ लाखांची तरतूद
पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून सांगली जिल्ह्यातील एकूण ९०० महिलांना उद्योजकता प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून एकूण १ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत बचत गटातील ५०० महिलांसाठी ९० लाख रुपये, महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत २५० महिलांसाठी ४५ लाख रुपये, तसेच महिला व बालविकास विभागामार्फत १५० महिलांसाठी २७ लाख रुपये अशी निधीची विभागणी करण्यात आली आहे.
विविध उद्योगांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण
या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत महिलांना विविध उद्योगांची प्रत्यक्ष माहिती आणि कौशल्ये दिली जात आहेत. यामध्ये होम डेकोर व भेटवस्तू निर्मिती, साडी परिधान कौशल्य, मेकअप, कार्यक्रम सजावट, फॅशन दागिने डिझाईन, बुटिक व्यवसाय, दुग्धजन्य उत्पादन प्रक्रिया, मसाला व मुखवास निर्मिती, केटरिंग व लघु हॉटेल व्यवस्थापन, हस्तकला, रेझिन आर्ट, अगरबत्ती व पूजासाहित्य निर्मिती अशा विविध व्यवसायांचा समावेश आहे.
संयुक्त विद्यमाने कार्यक्रम
जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महिला व बालविकास विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आलोक मिश्रा यांनी प्रशिक्षणामागील उद्दिष्टे स्पष्ट करत महिलांना स्वावलंबनाच्या दिशेने प्रेरित करण्याचा हेतू असल्याचे सांगितले. या उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील महिलांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
