‘स्वच्छ शहर जोडी’ उपक्रमात नवी मुंबईचा पुढाकार; पाच शहरांना मार्गदर्शनाची जबाबदारी
नवी मुंबई, दि. १९ : देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत सातत्याने आघाडीवर राहिलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेला ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत ‘स्वच्छ शहर जोडी’ या उपक्रमात ‘मार्गदर्शक शहर’ म्हणून महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत कन्नड, जिंतूर, केज या तीन नगरपंचायती तसेच लोणार आणि मलकापूर या दोन नगरपरिषदांना स्वच्छता व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्याची भूमिका नवी मुंबईकडे सोपविण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता अधिकाऱ्यांच्या पथकाने नुकतीच या पाचही शहरांना भेट देऊन तेथील स्वच्छता व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला. या पाहणीत घनकचरा व्यवस्थापन, कचरा वर्गीकरण, संकलन आणि विल्हेवाटीची पद्धत, सार्वजनिक स्वच्छता सुविधा, जलस्त्रोतांची स्वच्छता अशा विविध घटकांचा अभ्यास करण्यात आला.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश स्वच्छतेच्या बाबतीत प्रगत शहरांकडून इतर शहरांना मार्गदर्शन मिळावे आणि त्यातून त्यांच्या स्वच्छता व्यवस्थेत गुणात्मक सुधारणा व्हावी हा आहे. ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत यावर्षी देशातील १९६ शहरांना मार्गदर्शन करण्यासाठी ७२ मार्गदर्शक शहरांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये स्थान मिळवलेल्या नवी मुंबईचा समावेश आहे.
पाहणीदरम्यान नवी मुंबई महानगरपालिकेच्या पथकाने स्थानिक अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष क्षेत्रभेटी घेतल्या व स्वच्छता उपक्रमांची अंमलबजावणी कशी केली जाते याचा अभ्यास केला. तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या सहभागाची पातळी जाणून घेतली. स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून त्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याने जनजागृतीसाठी विविध माध्यमांचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात आला.
याशिवाय, ‘स्वच्छ सर्वेक्षण’ अंतर्गत सिटी प्रोफाइलमध्ये सादर करावयाच्या ऑनलाईन माहिती प्रक्रियेबाबतही संबंधित शहरांच्या अधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यांच्या शंकांचे निरसन करत योग्य माहिती नोंदविण्याच्या पद्धती स्पष्ट करण्यात आल्या.
दरम्यान, या पाचही शहरांतील अधिकारी आणि अभ्यासगटाने नवी मुंबईला भेट देऊन येथील प्रगत घनकचरा व्यवस्थापन प्रणालीचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, तसेच त्याचे अनुकरण करून आपल्या शहरातही प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘स्वच्छ शहर जोडी’ उपक्रमांतर्गत दिलेली ही जबाबदारी नवी मुंबई महानगरपालिका सक्षमपणे पार पाडत असून, या माध्यमातून राज्यातील तसेच देशातील इतर शहरांमध्ये स्वच्छतेबाबत सकारात्मक व शाश्वत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
