नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्याच्या शिष्टमंडळाची राष्ट्रपती भवनात भेट; गोदाआरती, कुंभमेळा गीत आणि टपाल तिकिटाच्या अनावरणाचेही आमंत्रण
नवी दिल्ली/नाशिक, दि. २१ : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असून, ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती भवनात त्यांची भेट घेऊन सोहळ्याचे आमंत्रण दिले. या भेटीत महाराष्ट्राची आध्यात्मिक परंपरा, आदिवासींची उद्योजकता, वस्त्रकला आणि खाद्यसंस्कृती यांची झलक असलेला खास भेटवस्तू संचही राष्ट्रपतींना सादर करण्यात आला.
ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचे निमंत्रण
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राज्य मंत्रिमंडळातील सदस्य आणि विविध अधिकारी-पदाधिकारी या शिष्टमंडळात सहभागी होते. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबरला होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याबरोबरच गोदाआरती, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन, कुंभमेळा गीताचे लोकार्पण, कुंभमेळ्यावरील कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन आणि विशेष टपाल तिकिटाच्या अनावरणासाठीही राष्ट्रपतींना आमंत्रण देण्यात आले.
या भेटीवेळी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन व कुंभमेळा मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ उपस्थित होते.
त्यांच्यासह नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके-आहेर, त्र्यंबक नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, त्र्यंबकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष तथा धर्मादाय सहआयुक्त न्यायमूर्ती विवेक सोनुणे, नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे नरसिंहकृपा दास, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांचाही समावेश होता.
निमंत्रणातून कुंभमेळ्याची आध्यात्मिक परंपरा
राष्ट्रपतींसाठी तयार केलेल्या निमंत्रण संचाला कलात्मक स्वरूप देण्यात आले आहे. पेटी उघडल्यानंतर कुंभमेळ्याचे पौराणिक संदर्भ, धार्मिक महत्त्व आणि भव्यता उलगडणारी त्रिमितीय कलाकृती दिसते. दृश्य, श्रवण, गंध, चव आणि स्पर्श अशा पंचेंद्रियांशी निगडित अनुभवांचा वापर करून नाशिकचा सांस्कृतिक वारसा आणि गोदावरीचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न या संकल्पनेतून करण्यात आला आहे.
आदिवासी उत्पादनांपासून पैठणीपर्यंत महाराष्ट्राची ओळख
भेटवस्तू संचामध्ये आदिवासी विकास विभागांतर्गत ‘शबरी नॅचरल्स’च्या उत्पादनांचाही समावेश आहे. अगरबत्ती, भरडधान्यांपासून बनवलेले खाद्यपदार्थ, मोहफुलांपासून तयार केलेली उत्पादने, बांबूच्या वस्तू आणि वनमध यांमधून आदिवासी समाजाचे पारंपरिक ज्ञान, कौशल्य आणि स्थानिक उद्योजकतेचे दर्शन घडवण्यात आले आहे.
आदिवासी कारागिरांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे, हा या निवडीमागील महत्त्वाचा संदेश आहे.
महाराष्ट्राच्या वस्त्रपरंपरेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी येवला येथील पैठणीचा समावेश करण्यात आला आहे. नाशिकच्या कृषी उत्पादनांची ओळख काळ्या मनुका आणि काजू यांमधून करून देण्यात आली आहे. स्थानिक खाद्यसंस्कृतीचे प्रतीक म्हणून नाशिकचा चिवडा, तसेच निवडक मिठाई आणि सुकामेव्याचे पदार्थही या संचात ठेवण्यात आले आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या निमंत्रणासोबतच महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि स्थानिक उत्पादनांच्या वैविध्याची ओळख राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवण्याचा या भेटीमागील प्रयत्न आहे.

