तुळापूर-वढू येथे उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
पुणे, दि. १८ : स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त (३३७ वा बलिदान स्मरणदिन) राज्यभर आदरांजली अर्पण करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र तुळापूर व वढू बु. येथे मोठ्या भक्तिभावाने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, विविध मान्यवरांनी उपस्थित राहून महाराजांच्या स्मृतींना अभिवादन केले.
राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी श्री क्षेत्र वढू बु. येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी तुळापूर येथील बलिदान स्थळी भेट देऊन महाराजांच्या शौर्यपूर्ण बलिदानाला अभिवादन केले.
या प्रसंगी आमदार ज्ञानेश्वर कटके, बापुसाहेब पठारे, जिल्हा परिषद सदस्य किरण साकोरे, मोनिका हरगुडे, पंचायत समिती सदस्य तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, अपर तहसीलदार तृप्ती कोलते, शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, वढू बु. येथील सरपंच कृष्णा आरगडे, तुळापूरच्या प्रशासक सरपंच ॲड. गुंफा इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी तुळापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मुकज्योत पदयात्रेत’ गावकऱ्यांसमवेत सहभाग घेतला. तसेच तुळापूर येथील पवित्र संगमस्थळी जाऊन संगमेश्वराचे दर्शन घेतले. पुण्यतिथी निमित्त परिसरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ, तुळापूर स्मारक तसेच वढू बु. येथील समाधी स्थळ परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेऊन ती कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व निश्चित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या दिवशी राज्यभरात विविध ठिकाणी संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेचे स्मरण करून युवकांना प्रेरणा देणारे कार्यक्रम, व्याख्याने आणि अभिवादन सोहळे आयोजित करण्यात आले होते.
