संजय राऊत यांनी स्पष्ट केली ठाकरे गटाची भूमिका
मुंबई, दि. ५: महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत शरद पवार Sharad Pawar यांची पुन्हा राज्यसभेवर निवड होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विरोधी पक्षांकडून उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, सातही जागांसाठी केवळ सातच उमेदवार मैदानात राहण्याची शक्यता असल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. तसेच सत्ताधारी भाजपने पाचवा उमेदवार न दिल्यामुळे सात जागांसाठी प्रमुख सात उमेदवार निश्चित होतील, असे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर वयाच्या ८५व्या वर्षी शरद पवार पुन्हा राज्यसभेत जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्या सुमारे साठ वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत आणखी सहा वर्षांची भर पडणार आहे.
संजय राऊत यांची प्रतिक्रिया
या निर्णयावर बोलताना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी महाविकास आघाडीने एकमताने घेतलेला निर्णय स्पष्ट केला.
आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आणि महाराष्ट्रातून विरोधी पक्षाला एकच जागा मिळते आणि ती सुद्धा आम्ही एकत्र राहिलो तर आणि काल सर्वानुमते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावावरती सगळ्यांनी सहमती दर्शवली. आदित्य ठाकरे सातत्याने सांगत होते हे खरं आहे, सर्वाधिक मोठा पक्ष शिवसेना आणि त्याच्यामुळे ही जागा शिवसेनेने लढवायला पाहिजे, ही भूमिका योग्य होती. त्यानंतर काँग्रेस पक्ष आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा लोक आहेत, तरीही आम्ही ही जागा शरद पवार यांच्यासाठी सोडली, सगळ्यांनी मिळून शरद पवार यांनी राज्यसभेत जावं यासाठी हा निर्णय घेतला. चर्चा झाली, उद्धवजींबरोबर काँग्रेसच्या नेत्यांबरोबर शरद पवारांचे जे राजकारणातल्या आणि समाजकारणातलं स्थान आहे आणि त्यांच्या नेतृत्व आहे, त्याच्यामुळे ही जागा आम्ही सन्माननीय शरद पवार यांच्यासाठी तिघांनी मिळून जाहीर केली आहे. आमचं जेवढी संख्या लागते जिंकण्यासाठी आमदारांची तेवढी आमच्याकडे आहे आणि भविष्यामध्ये महाविकास आघाडी येणाऱ्या अशा प्रकारच्या निवडणुका राज्यसभा विधान परिषद यासाठी काय निर्णय घ्यायचे आणि कोणी कोणती निवडणूक लढायची यासाठी आम्ही लवकरच तीन पक्ष एकत्र बसण्याचे ठरले आहे, शेवटी तिन्ही पक्षाचा आप-आपला वाटा आहे, असे ते अखेरीस म्हणाले.
राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता
राज्यातील राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असली तरी प्रमुख पक्षांकडून मर्यादित उमेदवार दिल्याने बिनविरोध निवड होण्याची शक्यता वाढली आहे. महाविकास आघाडीने एकत्रितपणे पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यामुळे विरोधी पक्षाची एकमेव जागा त्यांच्या वाट्याला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राजकीय वर्तुळात या निर्णयाला महाविकास आघाडीतील एकात्मतेचा संदेश म्हणूनही पाहिले जात आहे. आगामी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांसाठी तीनही पक्ष एकत्र बसून पुढील रणनीती ठरवतील, अशी माहितीही समोर येत आहे.
