रोहित पवारांचे ५ खळबळजनक सवाल; ‘मोसाद’चा दिला दाखला!
पुणे, दि. १०: विशेष प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला होता. मात्र, या दुर्घटनेला १२ दिवस उलटल्यानंतर आता त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाला ‘घातपाता’चे वळण दिले आहे. दादांचा कारने जाण्याचा प्लॅन विमानाकडे कसा वळवण्यात आला आणि त्या रात्री नेमकं काय घडलं, याचा खळबळजनक घटनाक्रम रोहित पवारांनी मांडला आहे.
१. कारचा प्लॅन बदलून ‘विमान’ प्रवास कोणी लादला?
रोहित पवारांनी दावा केला की, अजितदादांचा प्लॅन मुंबईहून बारामतीला कारने जाण्याचा होता. मात्र, पूर्व विदर्भातील एका नेत्याने एका फाईलवर सही करण्यासाठी त्यांना उशिरापर्यंत मंत्रालयात थांबवून ठेवले. तसेच, त्यांच्याच पक्षाचा एक मोठा नेता त्यांना भेटायला येणार होता, ज्याला यायला खूप उशीर झाला. यामुळे दादांना उशीर झाला आणि दुसऱ्या दिवशी घाईत त्यांना विमानाने जावे लागले. “हा सर्व वेळकाढूपणा दादांना विमानाने जाण्यास भाग पाडण्यासाठी होता का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
२. इस्त्रायली ‘मोसाद’ आणि घातपाताचा संशय
रोहित पवारांनी इस्त्रायलच्या गुप्तचर संघटना ‘मोसाद’ वर आधारित एका पुस्तकाचा संदर्भ दिला. “नेत्याला ठार करायचे असेल तर त्याच्या ड्रायव्हरला किंवा वैमानिकाला संपवा, असा मोसादचा एक एजंट म्हणायचा. अजितदादांच्या बाबतीतही असेच काही घडले आहे का? विमानाचे दोन्ही पायलट ऐनवेळी का बदलले? विमानाचा ट्रान्सपाँडर का बंद होता आणि पायलटने ‘मेडे’ कॉल (संकटाचा इशारा) का दिला नाही?” असे गंभीर प्रश्न त्यांनी विचारले.
३. सुरक्षेबाबत दादांना कुणकुण लागली होती?
रोहित पवारांनी एक महत्त्वाचा खुलासा केला की, गेल्या काही दिवसांपासून अजितदादांनी प्लास्टिकच्या बाटल्या वापरणे बंद केले होते आणि ते केवळ काचेच्या बाटलीतून पाणी प्यायचे. ही बाटली नेहमी त्यांच्या विश्वासू सुरक्षारक्षकाकडे असायची. “दादांना काही कुणकुण लागली होती का? म्हणून त्यांनी सुरक्षेच्या बाबतीत इतकी काळजी घ्यायला सुरुवात केली होती का?” असा संशय त्यांनी व्यक्त केला.
विमान अपघाताचा ‘ब्लॅक बॉक्स’ घटनाक्रम (२८ जानेवारी):
-
सकाळी ०७:५०: अजितदादा एअरपोर्टवर पोहोचले.
-
सकाळी ०८:१०: लेअरजेट विमानाचे (VSR कंपनी) टेक ऑफ झाले.
-
सकाळी ०८:२२: विमान लोणावळ्याजवळ होते.
-
सकाळी ०८:४३ – ०८:४५: विमान एका बाजूला कलले आणि दुर्दैवी अपघात झाला.
-
सकाळी ०९:४५: दादांच्या निधनाची अधिकृत बातमी आली.
रोहित पवारांचे ५ थेट प्रश्न:
१. विमानाचे एअरवर्थी रिपोर्ट आणि टेकलॉग कुठे आहेत? २. विमानाचे रूटीन मेंटेनन्स झाले नव्हते का? त्याचे सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे? ३. १६ वर्षे जुन्या विमानाची तांत्रिक पाहणी टेक ऑफ करण्यापूर्वी नीट झाली होती का? ४. विमानातील स्टॉल वॉर्निंग सिस्टिम आणि EGPWS अलर्ट का वाजले नाहीत? ५. व्हीएसआर (VSR) कंपनीच्या विमानांवर युरोपमध्ये बंदी असताना भारतात कारवाई का नाही?
आंतरराष्ट्रीय संस्थांकडून चौकशीची मागणी
“या अपघाताचा तपास केवळ इथल्या यंत्रणांनी करून चालणार नाही. फ्रान्स किंवा अमेरिकेच्या तपास संस्थांना (उदा. NTSB) पाचारण करावे,” अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. तसेच, VSR कंपनीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली. “ज्या ठिकाणी अपघात झाला, तिथे दादांचे घड्याळ (जे ते नेहमी १५ मिनिटे पुढे लावून ठेवायचे), त्यांचे स्वेटर आणि चपला सापडल्या आहेत. ही वस्तुस्थिती आता आपण स्वीकारली पाहिजे, पण सत्य जगासमोर यायलाच हवे,” असे भावूक आवाहन त्यांनी केले.
