“वैकुंठ मेहता संस्थेच्या पदवीधरांनी विश्वासार्हता आणि नवोन्मेषाच्या बळावर सहकार चळवळीचे नेतृत्व करावे” – सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
पुणे, दि. ७: केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या अखत्यारीतील पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेच्या (VAMNICOM) पदव्युत्तर पदविका व्यवस्थापन – कृषी व्यवसाय व्यवस्थापन (PGDM–ABM) या अभ्यासक्रमाच्या २०२३-२५ च्या तुकडीचा (३१) १७वा वार्षिक दीक्षांत समारंभ आज संपन्न झाला.

या समारंभात एकूण ९३ विद्यार्थ्यांना कृषी व्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर पदविका प्रदान करण्यात आली. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे मुख्य अतिथी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ३१ व्या तुकडीतील तीन गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदके आणि पदवी प्रदान करण्यात आली.
कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदव्युत्तर पदविका या अभ्यासक्रमाला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची (AICTE) मान्यता मिळालेली आहे, तसेच भारतीय विद्यापीठ संघटनेने (AIU) या अभ्यासक्रमाला व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी (MBA) समान दर्जा बहाल केला आहे आणि त्याला राष्ट्रीय अधिस्वीकृती मंडळाची (NBA) मान्यताही मिळालेली आहे.
संस्थेच्या प्रभारी संचालिका आणि नवी दिल्लीतील राष्ट्रीय सहकारी प्रशिक्षण परिषदेच्या सचिव मीनू शुक्ला पाठक यांनी मुख्य अतिथी, मान्यवर, पालक, प्राध्यापक आणि पदवीधर विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांनी पार पाडलेल्या शैक्षणिक तसेच शिक्षणेतर सह-उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली. शिवनेरी सभागृहाचे उद्घाटन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्तेच झाल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.

मुरलीधर मोहोळ यांनीही उपस्थितांना संबोधित केले. या ३१ व्या तुकडीच्या सर्व पदवीधर विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. कठोर परिश्रम आणि शिस्तीमुळेच विद्यार्थ्यांनी हा महत्त्वाचा यशदायी टप्पा गाठला असल्याचे ते म्हणाले. भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सहकार क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, सहकारातून समृद्धी या संकल्पनेअंतर्गत या क्षेत्राअंतर्गत मोठ्या सुधारणा आणि प्रगती घडून येत असल्याचे ते म्हणाले.

संस्थेचे पदवीधर हे केवळ व्यवस्थापन क्षेत्रातले व्यावसायिक तज्ञ नाहीत तर ते भारताच्या सहकार चळवळीचे भविष्यातील नेतृत्व असणार आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीच्या वाटचालीत विश्वासार्हता, सहकार्य, नवोन्मेष आणि जबाबदारी ही मूल्ये जपावीत असे आवाहनही त्यांनी केले. या सगळ्यांच्या योगदानामुळे देशाचे सहकार क्षेत्र नवी उंची गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संस्थेचे सह कार्यक्रम संचालक डॉ. डी. रवी यांनी पदक विजेत्यांच्या नावांची घोषणा केली. किशोर मनोग्ना सुंदरी यांनी या ३१ व्या तुकडीत प्रथम क्रमांक पटकावला, त्यांना भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाच्या गुणवत्ता सुवर्णपदकाने गौरवले गेले. कर्नाटी भानू श्री यांना भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाची गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि रौप्य पदकाने गौरवले गेले. पसुमती मोनिका सिरी यांना कांस्य पदकाने गौरवले गेले. संस्थेचे कुलसचिव डॉ. एस. धर्मराज यांनी या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाची जबाबदारी पार पाडली.
