रक्तनमुने बदलण्याचा आरोप
पुणे, दि. २: पुण्यातील बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणात (Pune Porsche Case) सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत मुख्य आरोपींपैकी आदित्य अविनाश सूद याच्यासह आशीष मित्तल आणि अमर गायकवाड या तिघांना नियमित जामीन मंजूर केला आहे. आरोपी गेल्या सुमारे १८ महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असल्याचा मुद्दा लक्षात घेत न्यायालयाने हा दिलासा दिला.
काय आहे प्रकरण?
१९ मे २०२४ रोजी पुण्यातील कल्याणीनगर परिसरात हा भीषण अपघात घडला होता. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका अल्पवयीन मुलाने पोर्शे कार चालवताना दुचाकीवरून जाणाऱ्या दोन आयटी अभियंत्यांना जोरदार धडक दिली होती. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती.
रक्तनमुने बदलण्याचा आरोप
अपघातानंतर तपासादरम्यान अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्यासोबत असलेल्या अन्य अल्पवयीनांचे रक्तनमुने बदलून तपासात अडथळा आणल्याचा गंभीर आरोप समोर आला. या प्रकरणात ५२ वर्षीय आदित्य अविनाश सूद आणि ३७ वर्षीय आशीष सतीश मित्तल यांना १९ ऑगस्ट २०२४ रोजी अटक करण्यात आली होती. त्यांच्यासोबत अमर गायकवाड याचाही समावेश होता.
सर्वोच्च न्यायालयात काय घडले?
सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान आदित्य सूद याच्यावतीने ज्येष्ठ वकील प्रशांत पाटील आणि वकील आबिद मुलानी यांनी बाजू मांडली. आरोपी तपासात सहकार्य करत असल्याने आणि दीर्घ काळ तुरुंगात असल्याने त्यांना जामीन द्यावा, असा युक्तिवाद करण्यात आला. यावर सुनावणी करत न्यायालयाने तिन्ही आरोपींना नियमित जामीन मंजूर केला.
न्यायालयाने स्पष्ट केले की, आरोपींनी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करणे, पुराव्याशी कोणतीही छेडछाड न करणे आणि न्यायालयाने घालून दिलेल्या अटींचे पालन करणे आवश्यक राहील. जामिनाच्या अटी ठरवण्याचे अधिकार संबंधित कनिष्ठ न्यायालयांना देण्यात आले आहेत.
न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांची कठोर टिप्पणी
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांनी समाजातील वाढत्या बेफिकिरीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “आनंद साजरा करण्याचा अर्थ वेगात गाडी चालवून फुटपाथवर झोपलेल्या गरीबांना चिरडणे नव्हे,” असे स्पष्ट मत त्यांनी नोंदवले. अशा घटना वारंवार घडत असून आता कायदा अधिक कडक करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच, या प्रकरणात पालकांची जबाबदारी अधिक असल्याचेही त्यांनी नमूद केले. पालक मुलांना ऐषआरामासाठी पैसे देतात; मात्र त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी वेळ देत नाहीत. परिणामी, ही पोकळी पैसे आणि एटीएम कार्ड देऊन भरून काढली जाते, अशी परखड टिप्पणीही त्यांनी केली.
