अजित पवार यांचा मृत्यू, घात कि अपघात? रुपाली पाटील ठोंबरेंनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
पुणे/बारामती, दि. १: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघाताला आता पाच दिवस उलटले आहेत. या भीषण दुर्घटनेत दादांसह पाच जणांचा अंत झाला. मात्र, या अपघाताचा घटनाक्रम पाहता यात काहीतरी ‘अघटित’ घडल्याचा संशय रुपाली पाटील ठोंबरे यांनी व्यक्त केला आहे. सीआयडी (CID) आणि केंद्रीय संस्थांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच, रुपाली पाटील यांनी ऐनवेळी बदललेले पायलट आणि विमानावरील सूक्ष्मातिसूक्ष्म बाबींवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
रुपाली पाटील ठोंबरे यांचे जसेच्या तसे वक्तव्य:
“मा.अजित दादांच्या अचानक जाण्याने बधिर झालो, कसे झाले का झाले काहीच कळत नाही. देवाने लाखोच्या पोशिंदा नव्हता न्यायचा आमच्या सारखे नेहयचे होते अत्यंत अघटीत घडले. आता जे घडले त्याचे सत्य संपूर्ण तपशील, पारदर्शक चौकशी जगासमोर येणे तितकेच महत्वपूर्ण आहे. राहून राहून मनात हे प्रश्न येतात त्याची उतरे मिळाली पाहिजेत. फ्लाइट 8 वाजता असताना कॅप्टन मदन आणि कॅप्टन यश ट्राफिकमध्ये अडकल्याचा दावा, दोघांचा एकाच वेळी उशीर, अचानक पायलट बदल आणि त्यानंतरची सेफ्टी प्रक्रिया—या सर्व बाबींची सविस्तर व पारदर्शक माहिती सार्वजनिक का नाही? याची चौकशी होणे गरजेचे कारण घात की अपघात?”
तपास यंत्रणांच्या हालचाली
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून केंद्र सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा डेटा आणि एटीसी (ATC) मधील संवादाची तपासणी सुरू आहे. रुपाली पाटील यांनी हा प्रश्न केवळ आपला नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातील असल्याची भावना व्यक्त केली आहे.
