भाजपच्या श्रद्धांजली जाहिरातींवर संजय राऊतांचे तीव्र भाष्य; जाणून घ्या संजय राऊत नेमके काय म्हणाले आहेत
बारामती/मुंबई, दि. २९: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
गुरुवारी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या आवारात अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यदर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून हजारोंचा जनसमुदाय बारामतीत दाखल झाला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह राज्य व देशातील अनेक वरिष्ठ नेते या अंत्यसंस्कारप्रसंगी उपस्थित होते. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
भाजपच्या जाहिरातींवरून राजकीय वाद
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर भाजपकडून राज्यातील प्रमुख दैनिकांमध्ये पानभर श्रद्धांजली जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर प्रतिक्रिया देत भाजपवर थेट निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे —
“भाजपने कमाल केली! दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पान भर जाहिराती दिल्या! त्याने काय होणार? अजित दादांवर भाजपा म्हणजेच पं. मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ७० हजार कोटींचे आरोप मागे घेणे हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल.”
आरोप-प्रत्यारोपांच्या नव्या फेरीची शक्यता
संजय राऊत यांच्या या विधानामुळे अजित पवार यांच्यावर पूर्वी करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. श्रद्धांजली जाहिराती आणि त्यामागील राजकीय भूमिकेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संजय राऊत यांच्या या टीकेनंतर भाजपकडून काय प्रतिक्रिया दिली जाणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
