पार्थिव समोर येताच ज्येष्ठ नेते शरद पवार भावूक
बारामती, दि. २९: राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे काल बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. आज बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजितदादा पवार यांच्या पार्थिवाला त्यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुखाग्नि दिला. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण बारामतीसह राज्यभरात शोककळा पसरली होती.
अजितदादा पवार यांचे पार्थिव सकाळी त्यांच्या मूळगावी काटेवाडी येथे ठेवण्यात आले होते. यावेळी हजारो नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मोठ्या प्रमाणावर जमाव जमल्याने काही काळ परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. आमदार रोहित पवार यांनी केलेल्या आवाहनानंतर पोलिसांच्या मदतीने गर्दी नियंत्रित करण्यात आली.
काटेवाडीत श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर अजितदादा पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान, बारामती येथे आणण्यात आले. येथे अंत्यसंस्कारासाठी विशेष चबुतरा उभारण्यात आला होता. पत्नी खासदार सुनेत्रा पवार, भगिनी, सून तसेच कुटुंबीयांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
राजकीय नेत्यांची मोठी उपस्थिती
अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी देशभरातून अनेक राजकीय नेते बारामतीत दाखल झाले होते. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह विविध पक्षांचे मंत्री, खासदार, आमदार आणि नेते उपस्थित होते. सर्वांनी पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली.
अंत्यसंस्कारापूर्वी महाराष्ट्र पोलिसांकडून अजितदादा पवार यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर विधीपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि समर्थकांनी घोषणा दिल्या.
अंत्यसंस्काराच्या वेळी ज्येष्ठ नेते शरद पवार हे चबुतऱ्यासमोरील मंडपात उपस्थित होते. पार्थिव समोर येताच ते भावूक झाल्याचे दिसून आले. विविध नेत्यांनी त्यांचे सांत्वन केले.
ग्रामीण महाराष्ट्राशी घट्ट नाळ जपणारे आणि प्रशासनातील अनुभवासाठी ओळखले जाणारे अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया अनेक नेत्यांनी व्यक्त केली आहे.
