नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गोंधळ
नाशिक, दि. २६: आज संपूर्ण देशात ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सकाळपासून विविध जिल्ह्यांमध्ये मंत्री, पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या हस्ते ध्वजारोहन पार पडले. दरम्यान, नाशिकमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या अधिकृत कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणादरम्यान अचानक गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याची घटना घडली.
नाशिक येथील कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन भाषण करत असताना, त्यांच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याचा आक्षेप घेत एका महिला कर्मचाऱ्याने थेट व्यासपीठासमोरून त्यांना जाब विचारला. या घटनेमुळे काही काळ कार्यक्रमस्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
महिला कर्मचाऱ्याची ओळख समोर
मंत्र्यांना जाब विचारणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचे नाव माधवी जाधव असून त्या वन विभागात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
“सस्पेंड केलं तरी चालेल, पण माफी मागणार नाही”
या घटनेनंतर आपली भूमिका स्पष्ट करताना माधवी जाधव यांनी सांगितले की, “मंत्र्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. ज्यांनी देशाला संविधान दिले, लोकशाही घडवली, त्या व्यक्तीचे नाव वगळणे ही मोठी चूक आहे. मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही.”
त्या पुढे म्हणाल्या, “मी मीडियाशी देणं-घेणं ठेवत नाही. मला वाळूच्या गाड्या उतरवायला लावल्या, मातीचं काम दिलं तरी मी करेन. पण बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही. त्यांनी आपली चूक स्वीकारावी.”
भाषणातील उल्लेखावर उपस्थित केले सवाल
माधवी जाधव यांनी पुढे सांगितले की, “बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, याची मी वाट पाहत होते. मात्र संपूर्ण भाषणात बाबासाहेबांचं नाव आलं नाही. लोकशाही आणि संविधानाशी थेट संबंध नसलेल्या व्यक्तींची नावं वारंवार घेण्यात आली. मग प्रजासत्ताक दिनाचा आणि संविधानाचा खरा मानकरी असलेल्या बाबासाहेबांचं नाव भाषणात का नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या घटनेनंतर कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी माधवी जाधव यांना ताब्यात घेतले. घटनेनंतर कार्यक्रम नियोजित वेळापत्रकानुसार पुढे सुरू ठेवण्यात आला.
