चालू घडामोडींमुळे ठाकरे बंधूंच्या पक्षांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता
कल्याण/डोंबिवली, दि. २०: राज्यात महापालिका निवडणुकांनंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, मुंबई महापालिकेसह इतर महत्त्वाच्या महापालिकांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जाणारी कल्याण–डोंबिवली महानगरपालिका (KDMC) येथे मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली आहे. येथे शिंदे गटाच्या शिवसेनेला थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) कडून पाठिंबा जाहीर झाल्याने सत्तास्थापनेचे गणित बदलले आहे.
कल्याण–डोंबिवली महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी ६२ नगरसेवकांचा बहुमताचा आकडा आवश्यक आहे. सध्याच्या स्थितीत शिंदे गटाच्या शिवसेनेकडे ५३ नगरसेवक आहेत, तर भारतीय जनता पार्टीकडे ५० नगरसेवक आहेत. या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे ११ आणि मनसेचे ५ नगरसेवक निवडून आले होते. मात्र निकालानंतर ठाकरे गटातील मधुर म्हात्रे आणि किर्ती ढोणे हे दोन नगरसेवक बेपत्ता झाल्याची चर्चा रंगली होती. पुढे कोकण विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणीसाठी जाताना ठाकरे गटाचे आणखी दोन नगरसेवक गैरहजर राहिल्याने त्यांचे संख्याबळ ११ वरून ७ वर आले.
दरम्यान, निवडणुकांच्या काळात परस्परविरोधात उभ्या ठाकलेल्या मनसेने थेट शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने राजकीय चित्र बदलले आहे. ठाकरे गटातून बाहेर पडलेले दोन नगरसेवक हे मूळचे मनसेचे कार्यकर्ते असल्याचा दावा करत त्यांनी पुन्हा मनसेत प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. हे दोन आणि मनसेचे निवडून आलेले ५ असे एकूण ७ नगरसेवकांनी शिंदे गटाच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. याबाबत माहिती देताना शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मनसेने शिवसेनेला समर्थन दिल्याचे स्पष्ट केले.
या घडामोडींमुळे ठाकरे बंधूंच्या पक्षांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी सत्तास्थापनेसाठी मनसेने घेतलेली भूमिका निर्णायक ठरत आहे.
ठाकरे गटाची कायदेशीर कारवाईचा इशारा
दरम्यान, गट नोंदणीच्या वेळी कोकण भवन येथे शिवसेना ठाकरे गटाचे ४ नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने त्या नगरसेवकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मशाल चिन्हावर निवडून आलेले हे नगरसेवक सत्तास्थापनेच्या निर्णायक टप्प्यावर गैरहजर राहिल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
एकूणच, कल्याण–डोंबिवली महापालिकेतील या घडामोडींमुळे राज्याच्या शहरी राजकारणात नवे समीकरण आकाराला येत असून, महापौरपद आणि सत्तास्थापनेबाबतचे अंतिम चित्र येत्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
