संख्याबळावर भाजपचा दावा, पण युती अपरिहार्य
मुंबई, दि. १७: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून, या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ८९ जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या निकालासोबतच मुंबई महानगरपालिकेवर गेल्या २५ वर्षांपासून असलेली शिवसेनेची सत्ता संपुष्टात आली असून, भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्या युतीने सत्तास्थापनेचा दावा केला आहे.
निवडणूक निकालानंतर आता बृहन्मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान महापौरपदावरून मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या होत्या. ठाकरे बंधूंनी मुंबईचा महापौर मराठी व्यक्तीच असेल, अशी भूमिका मांडली होती. या पार्श्वभूमीवर सुरुवातीला भाजपकडून व्यक्त झालेल्या भूमिकेनंतर, मुंबईचा महापौर मराठीच असेल, असे स्पष्ट करण्यात आले होते.
महापौर निवडीसाठी अजून प्रतीक्षा
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या महापौरपदाची निवड जानेवारी महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात नगरविकास विभागाकडून महापौर पदासाठी सोडत काढली जाणार आहे. सोडत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारणतः दहा दिवसांच्या आत महापौर निवड होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ८९ जागा, तर शिंदे गटाच्या शिवसेनेने २९ जागा जिंकल्या आहेत. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी किमान ११४ जागांची आवश्यकता असून भाजपला एकहाती हा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे शिंदे गटाच्या पाठिंब्याशिवाय सत्ता स्थापन करणे शक्य नाही.
या पार्श्वभूमीवर भाजपकडून महापौरपदावर दावा करण्यात येत असला, तरी शिंदे गटातील काही नेत्यांनीही महापौरपदासाठी इच्छुक असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे युतीतील अंतर्गत समन्वयातून महापौरपदाचा निर्णय कसा घेतला जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
