मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल जाहीर; २२७ जागांसाठी ५२.९४ टक्के मतदान, सत्तास्थापनेकडे सर्वांचे लक्ष
मुंबई, दि. १६: मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल (BMC Election Result 2026) जाहीर होण्यास सुरुवात झाली असून, मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी एकूण ५२.९४ टक्के मतदान झाले आहे. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी ११४ जागांचा बहुमताचा आकडा आवश्यक असून, हा टप्पा कोण गाठणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
यंदाच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल २० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आल्याने ही निवडणूक अधिकच हायव्होल्टेज ठरली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटाने राज ठाकरे यांच्या मनसेसोबत युती करत निवडणूक लढवली. या युतीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबाही मिळाला. त्यामुळे मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे मैदानात उतरली होती.
दुसरीकडे, ठाकरे यांचा पारंपरिक गड काबीज करण्यासाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवली. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली, तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने आघाडी करून उमेदवार दिले.
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. यामध्ये मुंबई, ठाणे आणि नाशिक महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे विशेष लक्ष वेधले गेले होते. त्यातच मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू जवळपास दोन दशकांनंतर एकत्र आल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष मुंबईकडे केंद्रीत झाले होते.
शिंदे गटाला मोठे धक्के; समाधान सरवणकर पराभूत
दरम्यान, मतदान आणि निकालाच्या कलांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला काही ठिकाणी मोठे धक्के बसल्याचे चित्र आहे. मुंबईतील प्रभादेवी–दादर परिसरातील वॉर्ड क्रमांक १९४ मधील लढत विशेष लक्षवेधी ठरली होती.
या वॉर्डमधून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून माजी नगरसेवक सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान सरवणकर उमेदवार होते. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे हे उमेदवार होते. या थेट शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत समाधान सरवणकर यांचा पराभव झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांचे पती असलेल्या समाधान सरवणकर यांनी प्रचारात मोठी मेहनत घेतली होती. मात्र, मतदारांनी त्यांना नाकारल्याचे निकालातून समोर आले आहे. या पराभवामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईत राजकीयदृष्ट्या मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
