मराठी अस्मिता, हिंदुत्व आणि विकासावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य
मुंबई, दि. १४: मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. मराठी माणसाच्या विकासाबाबत बोलताना त्यांनी गेल्या २५ वर्षांत अनेक मराठी नागरिकांना रोजगारासाठी मुंबईबाहेर जावे लागल्याचा उल्लेख केला आणि यालाच विकास म्हणता येणार नाही, असे मत व्यक्त केले. परप्रांतियांना दोन थोबाडीत मारणे म्हणजे विकास नाही, असा टोमणा त्यांनी ठाकरे बंधूंना लगावला.
मराठी–अमराठी असा भेद निर्माण करून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न झाला, मात्र मराठी समाज संकुचित नसल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात क्षेत्रीय अस्मिता आणि मराठी भाषेचा अभिमान आहे, तसेच मराठी माणूस राज्यात सुरक्षित राहिला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या मते हिंदुत्व आणि विकास हे वेगळे मुद्दे नाहीत, ते म्हणाले, “आम्ही हिंदुत्त्व नाही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढली. हिंदुत्व आणि विकास वेगळे होऊ शकत नाही. आमचं हिंदुत्व संकुचित नाही. आमचं हिंदुत्व हे पूजा पद्धतीवर आधारित नाही. भारतीय संस्कृती, प्राचीन भारतीय जीवनपद्धती मानणाऱ्यांना आम्ही हिंदू मानतो, आम्ही त्यांना सोबत घेऊ चालू. त्यामुळे मराठी आणि हिंदू हे वेगळे होऊ शकत नाही.”
वरळीतील बीडीडी चाळीला भेट
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी वरळी येथील बीडीडी चाळीतील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक नागरिकांनी विविध विकासकामांसाठी त्यांचे आभार मानले. बीडीडी चाळीच्या पुनर्विकासावरून श्रेयवादाची चर्चा सुरू असताना ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
मुंबईसह राज्यातील महानगरपालिकांमध्ये महायुतीला यश मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर होईल, तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकाही महायुती जिंकेल, असे त्यांनी सांगितले. २६ ते २७ महानगरपालिकांमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा महापौर असेल, असा दावा त्यांनी केला.
ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका
ठाकरे बंधूंच्या युतीवर निशाणा साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही युती प्रेमातून नव्हे तर राजकीय भीतीतून झाल्याचे मत पुन्हा मांडले. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्ष आपले अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र आल्याचा दावा त्यांनी केला.
*संग्रहित छायाचित्र
