नवी मुंबईतील शालेय विद्यार्थ्यांकडून पालकांना संकल्पपत्राव्दारे मतदानाचे आवाहन
नवी मुंबई, दि. ५: १५ जानेवारी २०२६ रोजी होणा-या नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा याकरिता महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने निवडणूक विषयक ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.
अशाच प्रकारचा ‘मतदान संकल्पपत्र’ हा एक अभिनव उपक्रम ‘आमचा संकल्प १०० टक्के मतदानाचा’ या शिर्षकांतर्गत नवी मुंबईतील शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. ५२ दिघा मध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात हा मतदानाचा संकल्पपत्र उपक्रम यशस्वी केला. यापुढील काळात महानगरपालिकेच्या तसेच खाजगी अशा सर्वच शाळांमध्ये संकल्पपत्राचा हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. दोन भागांमध्ये विभागलेल्या या संकल्पपत्राचा सुरुवातीचा भाग ‘प्रिय आई बाबा..’ या संबोधनाने सुरु होत असून विद्यार्थी आपल्या पालकांना संकल्पपत्रातून आवाहन करीत आहेत की, “माझे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी तुम्ही दिवस-रात्र परिश्रम करत आहात. माझे भविष्य देशाच्या मजबूत लोकशाहीशी जोडलेले आहे. यासाठी मी तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये गुरुवार दि. १५ जानेवारी २०२६ रोजी तुमचे अनमोल मत द्यायला जरुर जायचे आहे, असा संकल्प करायला लावणार आहे. मला विश्वास आहे की तुम्ही हा संकल्प निश्चित पूर्ण करणार.” अशा मजकुराखाली प्रत्येक विद्यार्थी त्याचे संपूर्ण नाव, इयत्ता व शाळेचे नाव लिहील.
संकल्पपत्राच्या त्याखालील भागात ‘आई-वडीलांचा संकल्प’ हा स्वतंत्र भाग ठेवण्यात आला असून त्यामध्ये, “आम्ही शपथ घेतो की, भारतीय घटनेने आम्हाला दिलेल्या मतदानाच्या अमूल्य अधिकाराचा कोणत्याही परिस्थितीत वापर करुन मतदान करु तसेच आमच्या कुटूंबातील सदस्यांना व परिचित व्यक्तींनाही मतदान करण्यासाठी प्रेरित व प्रोत्साहित करु. तसेच आम्ही कोणत्याही भितीपोटी, लालसेपोटी, मतदान करणार नाही. तसेच धर्मनिरपेक्ष भावनेने मतदान करण्याची जबाबदारी पार पाडू” अशा संकल्पाचा उल्लेख केलेला आहे. शाळेतील विद्यार्थी हे संकल्पपत्र वाचून व सही करुन घरी नेतील आणि त्यावर खालील भागात असलेल्या आई-वडीलांचा संकल्प यामध्ये त्यांच्या सही व नावासह मतदान करणार असे संकल्पपत्र भरुन घेतील.
विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या पालकांना मतदानाचे महत्व सांगणारा संकल्पपत्राचा आगळावेगळा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनातही लहान वयातच मतदानाचे महत्व रुजवणारा आहे. त्यामुळे हे विद्यार्थी १८ वर्षाचे होतील आणि मतदानास पात्र ठरतील तेव्हा नक्कीच मतदान करतील. त्यामुळे १०० टक्के मतदानाचा संकल्प प्रसारित करणारा हा आगळावेगळा उपक्रम विद्यार्थ्यांच्या वतीने पालकांना मतदानाचे आवाहन करणारा आहे.
