“आदिवासींच्या जल, जंगल, जानवर जमीन मध्ये तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक” – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
अमरावती/नागपूर, दि. १७: आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि जानवर यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असून या माध्यमातून त्यांचा सर्वांगीण विकास घडून येईल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. अमरावतीच्या मेळघाट येथील धारणी तालुक्यातील कोठा येथे संपूर्ण बांबू केंद्राच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ग्रामज्ञानपीठ येथे ग्राम ज्ञानपीठ संग्रहालयाच भूमिपूजन व राष्ट्रीय कौशल्य विकास निगम दिल्ली प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षित कारागिराचे एकत्रीकरण कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले होते यावेळी मुख्य अतिथी म्हणून गडकरी बोलत होते. याप्रसंगी संपूर्ण बांबू केंद्राच्या अध्यक्षा डॉ. निरुपमा देशपांडे, आदिवासी कल्याण आश्रम संस्थेचे योगेश बापट उपस्थित होते.
आदिवासींच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्टीने मागासलेपण आहे. त्यांचा विकास केंद्रस्थानी ठेवून काम करणाऱ्या मोजक्या संस्थांपैकी संपूर्ण बाबू केंद्र आहे असं सांगून गडकरी यांनी या केंद्राच्या संचालिका निरूपमा देशपांडे यांच्या कार्याचे कौतुक केले. बांबू पासून इथेनॉल निर्मिती, कपडे, लोणचे त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्गामध्ये रस्त्यालगतचे क्रॅश बॅरियर देखील बनवत असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

आज विविध क्षेत्रात तंत्रज्ञानाने प्रगती केली आहे. याचा उपयोगही करून घेणे आवश्यक आहे. आदिवासींनी कृषीमध्ये सेंद्रिय शेतीचा अवलंब, बांबू पासून कौशल्य निर्मितीच्या साह्याने विविध प्रकारच्या वस्तू बनवणे आणि त्यांचे विपणन हे चांगल्या रीतीने करणे आवश्यक असल्याचे यांनी यावेळी नमूद केले.
येत्या काळात कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून संपूर्ण बांबू केंद्रामध्ये ५ कोटी रुपयांच्या कोसा साडी निर्मितीचा उद्योग उभारण्यात येणार आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली. प्रकल्पासाठी आवश्यक असणारा दोन कोटी रुपयांचा निधी स्वतःमार्फत देण्याची देखील त्यांनी घोषणा केली. तसेच ३ कोटी रुपयांचे केंद्र शासनातर्फे सहकार्य देण्यात येईल असेही त्यांनी सांगितलं. साडी निर्मितीसाठी आवश्यक ते प्रशिक्षणही नागपूरच्या धापेवाडा केंद्रातील कौशल्य प्रशिक्षण केंद्रद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

मेळघाटातील रस्त्यांच्या प्रश्नांची पूर्ण जाण आहे. रस्त्यांच्या विकासाशिवाय या भागाचा विकास शक्य नाही. देशातील महामार्गाचे काम एशियन बँक करीत आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून या रस्त्याचे काम कशा पद्धतीने करण्यात येईल, याची माहिती घेण्यात येईल असे सांगून गडकरी यांनी अमरावती – बुऱ्हानपुर यवतमाळ हा रस्ता चौपदरी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. ग्राम ज्ञानपीठ येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्यवस्थेसाठी दरवर्षी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणाही गडकरी यांनी केली.
BEXZ.jpeg)
मेळघाट मध्ये दूध संकलनाची मोठी क्षमता असून मदर डेअरीच्या माध्यमातून दूध संकलनासाठी धारणी आणि मेळघाट येथे मदर डेअरीचे दूध संकलन केंद्र उभारण्यात येईल. दूध व्यवसायाच्या माध्यमातून या भागात समृद्धी येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. यावेळी गडकरी यांच्या हस्ते कारागीर हाटचे विमोचन करण्यात आले. यावेळी गरजू कुटुंबांना गॅस शेगडीचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला संपूर्ण बाबू केंद्राचे पदाधिकारी त्याचप्रमाणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

