“आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या…हा आहे अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र!” – शिवसेना(ठाकरे गट) नेते अंबादास दानवे
मुंबई/पुणे, दि. ६: काल लोकसभेतील विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात सादरीकरण करत कथित हायड्रोजन बॉम्ब फोडला होता तर आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित एक कथित जमीन घोटाळा उघड करत खळबळ उडवून दिली आहे. या संदर्भात दानवे यांनी माय्क्रोब्लोगिंग साईट एक्स वर एक सविस्तर पोस्ट केली आहे. पार्थ पवार यांच्या एका कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील १८०० कोटी रुपये बाजारमूल्य असलेली जमीन ३०० कोटींना विकत घेऊन त्यावर देय असलेले अंदाजे २१ कोटी रुपये मुद्रांकशुल्क माफ करून घेत निव्वळ ५०० रुपये मुद्रांकशुल्क भरल्याचा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.
जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत अंबादास दानवे.
मेवाभाऊंच्या राज्यात…
१८०० कोटींची जमीन३०० कोटींत खरेदी,स्टॅम्प ड्युटी अवघे ५०० रुपये!उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे १ लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे १८०० कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची ३०० कोटींना खरेदी करता आली. हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावं.गंमत तर पुढे आहे..एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीने रियल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क (पुणे) येथे चक्क आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली. एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, (ते ही महार वतानाची जमीन असताना) हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावे, जेणेकरून इतर तरुणांनाही त्यांच्या या यशाचे गमक कळून येईल!दुसरी बाब, सरकारी यंत्रणाही काय तत्पर झाली पहा.. कमाल झाली! २२ एप्रिल २०२५ रोजी अमेडिया कंपनीने आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला. आश्चर्य म्हणजे अवघ्या ४८ तासात उद्योग संचालनालयाने या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटीही माफ करून टाकली. उद्योग संचालनालयाने कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली? यावर कळस म्हणजे २७ दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे-तिकडे झाला आणि या ४० एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त रुपये ५००!फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या.. हा आहे अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र!
(क्रमशः)https://x.com/iambadasdanve/status/1986105374689357863
पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनीहि एक्स वर पोस्ट करत काही गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. कॉंग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना “देवाभाऊ, आता कारवाई करणार की पाठीशी घालणार?” असा सवाल उपस्थित केला आहे. वडेट्टीवार पुढे म्हणाले, “पुण्यातील अशा विविध जमिनीच्या व्यवहारात एक लाख कोटीचे घोटाळे झाले आहेत. असे घोटाळे शोधल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि मदत करणे सहज शक्य आहे. पारदर्शक कारभाराचा दावा करणारे मुख्यमंत्री फक्त सत्ता टिकवण्यासाठी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणार की कारवाई करणार? कोरेगाव पार्क येथील व्यवहार रद्द करून चौकशी झालीच पाहिजे.”
