‘मन कि बात’ मध्ये सणासुदीदरम्यान स्वदेशी वस्तूंची खरेदी करण्याचे देशवासियांना केले आवाहन
नवी दिल्ली, दि. २८: आगामी सणासुदीचा काळ स्वदेशी गोष्टींचा वापर करून साजरा करण्याचा संकल्प करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे सव्वीसाव्या भागात देशवासीयांशी संवाद साधला. आपल्याला आत्मनिर्भर बनायचं आहे आणि या ध्येयाचा मार्ग स्वदेशीतूनच पुढे जातो असं ते म्हणाले. जीएसटी सुधारणांमुळे बचत उत्सव साजरा होत असताना व्होकल फॉर लोकल हा आपल्या सर्वांचा खरेदीचा एक मंत्र बनला पाहिजे, या संकल्पामुळे आपल्या सणांची रंगत अनेक पटीनं वाढेल असं त्यांनी सांगितलं. सण उत्सवांच्या निमित्ताने आपण करत असलेली स्वच्छता घरापुरती मर्यादित राहू नये, तर संपूर्ण परिसराची स्वच्छता देखील आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. यानिमित्तानं त्यांनी दिवाळीसाठी शुभेच्छाही दिल्या.
आजच्या दिवशीच हुतात्मा भगतसिंग आणि महान गायिका लता मंगेशकर यांची जयंती असल्याचं स्मरण करून देत त्यांनी या दोघांनाही अभिवादन केलं, आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला. भगतसिंगाचं व्यक्तीमत्व प्रत्येक भारतवासीयासाठी, विशेषतः देशातल्या युवा वर्गासाठी प्रेरणादायी आहे, असं त्यांनी सांगितलं. लता मंगेशकर यांच्या गाण्यांमध्ये मानवी संवेदनांना सचेत करण्याची ताकद होती, असं सांगून त्यांनी लता दिदींसोबतच्या आपल्या स्नेहपूर्ण नात्यालाही उजाळा दिला.
नवरात्रौत्सवाचं औचित्य साधून प्रधानमंत्र्यांनी देशाच्या महिला शक्तीच्या सामर्थ्याचा गौरव केला. आज व्यवसाय, क्रीडा, शिक्षण ते विज्ञान अशा प्रत्येक क्षेत्रात भारताच्या महिलांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे, त्या आपण कल्पनाही करू शकत नाही अशा कठीण आव्हानांवर मात करत आहेत असं ते म्हणाले. यानिमित्तानं त्यांनी नौदलाच्या दीर्घ सागरी सफरीत सहभागी झालेल्या लेफ्टनंट कमांडर दिलना आणि लेफ्टनंट कमांडर रुपा यांच्याशी संवाद साधून, त्यांच्या आव्हानात्मक सफरीचे अनुभव ऐकण्याची संधी श्रोत्यांना दिली. सण-उत्सवांनी भारताची संस्कृती जिवंत ठेवली आहे असं ते म्हणाले. या अनुषंगानंच आज जागतिक सण बनलेल्या छठ पूजेच्या महापर्वाचा युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा यादीत समावेश व्हावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं.
येत्या २ ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती साजरी करताना खादीचं कोणतंही उत्पादन खरेदी करून, अभिमानाने ते व्होकल फॉर लोकल या हॅशटॅगसोबत समाजमाध्यमांवर सामायिक करावं असं आवाहन त्यांनी केलं. परंपरा आणि नवोन्मेषाच्या मिलाफातून देशभरात हातमाग क्षेत्रात सुरु असलेल्या अभिनव प्रयोगांच्या यशोगाथा आणि त्यातून निर्माण झालेल्या रोजगारांची माहिती त्यांनी दिली. या यशोगाथांमधून आपल्या परंपरांमध्ये उत्पन्नाची असंख्य साधनं दडलेली असल्याची प्रचिती येते असं ते म्हणाले. लोकप्रिय आसामी गायक जुबीन गर्ग आणि प्रसिद्ध कन्नड साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांचं स्मरण करत प्रधानमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजलीही वाहिली.
जाणून घ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल पंतप्रधान काय म्हणाले
“आगामी काही दिवसातच आपण विजयादशमी साजरी करणार आहोत. यावर्षीची विजयादशमी आणखी एका कारणामुळे खूप जास्त विशेष आहे. याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्ष होत आहेत. एका शताब्दीचा हा प्रवास जितका अद्भूत आहे, अभूतपूर्व आहे, तितका तो प्ररेक आहे. आजपासून १०० वर्षांपूर्वी ज्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती, त्यावेळी देश अनेक युगांपासून गुलामीच्या साखळदंडामध्ये बांधलेला होता. शतकांपासून सुरू असलेल्या या गुलामीने आपल्या स्वाभिमानाला आणि आत्मविश्वासाला खूप खोलवर इजा पोहोचवली होती. संपूर्ण विश्वातील सर्वात प्राचीन संस्कृतीसमोर तिची ओळख तरी शिल्लक राहणार की नाही, असे संकट उभे केले जात होते. देशवासी हीन-भावनेचे शिकार होत होते. म्हणूनच देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच इतरांच्या वैचारिक गुलामगिरीतून मुक्त होणेही तितकंच महत्वाचं होतं. अशा काळामध्ये परमपूज्य डॉक्टर हेडगेवार जी यांनी या विषयी विचारमंथन सुरू केले आणि त्यानंतर या भगीरथ कार्यासाठी त्यांनी १९२५ च्या विजयादशमीच्या शुभदिनी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ची स्थापना केली. डॉक्टर साहेब गेल्यानंतर परम पूज्य गरूजींनी राष्ट्रसेवेचा हा महायज्ञ पुढे सुरू ठेवला. परमपूज्य गुरूजी असे म्हणायचे की – ‘‘ राष्ट्राय स्वाहा, इदं राष्ट्राय, इदं न मम‘‘ याचा अर्थ असा की, ही गोष्ट माझी नाही. ती राष्ट्राची आहे. यामध्ये स्वार्थाच्याही पलिकडे जावून राष्ट्रासाठी समर्पण भाव आपल्याठायी निर्माण करण्याची प्रेरणा आहे. गोळवलकर गुरूजींच्या या वाक्यामुळे लक्षावधी स्वयंसेवकांना त्याग आणि सेवा यांचा मार्ग दाखवला. त्याग आणि सेवेची भावना आणि शिस्तीचे धडे, हीच संघाची खरी ताकद आहे. आज आरएसएस १०० वर्षे विना थकता, विना थांबता, अखंड राष्ट्रसेवेच्या कार्यामध्ये गुंतलेला आहे. म्हणूनच आपण पाहतो आहोत, देशामध्ये कुठेही नैसर्गिक आपत्ती आली तर आरएसएसचे स्वयंसेवक सर्वात प्रथम तिथे पोहोचतात. लक्षावधी स्वयंसेवकांचे जीवन प्रत्येक कर्म, प्रत्येक प्रयत्न हे राष्ट्र प्रथम ‘नेशन फर्स्ट‘ या भावनेने संघ कार्यकर्ते करतात. राष्ट्र प्रथम, सर्वोपरी असेच त्यांना वाटते. राष्ट्रसेवेच्या या महायज्ञामध्ये स्वतःला समर्पित करणा-या प्रत्येक स्वयंसेवकाला मी आपल्या शुभेच्छा अर्पित करतो.”
Source – AIR
