हैदराबाद गॅझेटियरबाबतच्या निर्णयामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता वाढत असल्याचा काँग्रेसचा आरोप
मुंबई, दि. १९: हैदराबाद गॅझेटियरबाबतच्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता वाढत असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते. या प्रश्नावर सरकारने बैठक बोलवावी, ओबीसी आरक्षणाला धक्का लागला आहे याचे पुरावे आम्ही देऊ, असं त्यांनी सांगितलं. ओबीसी उपसमितीचे सदस्य असलेले ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे बाहेर एक भूमिका मांडत आहे तीच भूमिका त्यांनी बैठकीत मांडावी, असंही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
जाणून घ्या नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार
- ओबीसी उपसमितीचे सदस्य असलेले ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे बाहेर एक भूमिका मांडत आहे तीच भूमिका त्यांनी बैठकीत मांडावी. ओबीसी विरोधातील हा शासन निर्णय कोण रद्द करणार, कधी करणार असा माझा त्यांना सवाल आहे.
- जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांना पाडा असे आवाहन भुजबळ करत असतील तर मग सरकारच पाडले पाहिजे, ओबीसी आरक्षणावर गदा आणणारा शासन निर्णयच सरकारने काढला आहे. त्या मंचावर सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गेले होते. एकीकडे छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांचे कौतुक करणार दुसरीकडे टीका करायची हा दुटप्पीपणा आहे.
- ओबीसी आरक्षणाला जर धक्का लागत नाही तर सरकारने सर्व नेत्यांना बोलवावे चर्चा करावी मग आम्ही पुरावे देऊ ओबीसींचे काय नुकसान होत आहे. महायुती सरकारने काढलेल्या शासन निर्णयामुळे मराठवाडा पेटला आहे ओबीसी विरुद्ध मराठा पुन्हा वाद वाढला आहे. शाळांमधून विद्यार्थ्यांना काढले जात आहे इतका दोन समाजात द्वेष पसरला आहे. या सरकारला महाराष्ट्राचा विकास करायचा नाही पण जातीपातीचे राजकारण करून महाराष्ट्र खड्ड्यात घालत आहे.
