मतदार याद्या पुनरिक्षणावर चर्चेची मागणी करत विरोधी पक्ष सदस्यांनी लोकसभा व राज्यसभा दणाणून सोडली
नवी दिल्ली, दि. ८: मतदार याद्यांतील कथित घोटाळ्यांवर बोट ठेवत कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी आज राज्यसभा व लोकसभा दणाणून सोडली. बिहारमधलं मतदारयाद्यांचं पुनरिक्षण आणि इतर विविध मुद्द्यांवर विविध पक्षांकडून आलेले २० स्थगन प्रस्ताव राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी फेटाळले. या विरोधात निषेधात सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. या अधिवेशनात व्यत्यय आल्यानं राज्यसभेच्या कामकाजाचे ५६ तास वाया गेले असल्याचं हरिवंश म्हणाले. गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज त्यांनी आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित केलं.
लोकसभेत माजी सदस्य सत्यपाल मलिक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करुन आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभापती ओम बिरला यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मतदार याद्या पुनरिक्षणावर चर्चेची मागणी करत विरोधी पक्ष सदस्यांनी प्रचंड गदारोळ केला. सभापतींनी आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर ३ वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं.
Source – AIR
