“आरक्षणाचा लाभ अनुसूचित जातीतील अधिक गरजू युवकांना घेऊ द्यावा” – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
मुंबई, दि. ८ : अनुसूचित जातीतील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आता गुणवत्तेवर प्रवेश तसेच नोकऱ्या मिळवण्याचा प्रयत्न करावा व आरक्षणाचा लाभ अनुसूचित जातीतील अधिक गरजू युवकांना घेऊ द्यावा, असे आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८० वा वर्धापन दिन राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. ८ जुलै) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, पीपल्स एज्युकेशन सोसायटी शैक्षणिक संस्था व वसतिगृहे निर्माण करून लाखो विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचे कार्य करीत असल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन करताना आज अनुसूचित जातीतील अनेक विद्यार्थी आपल्या गुणवत्तेवर वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न देखील हेच होते, असे सांगून आरक्षण ही विकासाची किल्ली आहे, मात्र विद्यार्थी व युवकांनी आता जागतिक स्तरावर स्पर्धेसाठी तयार राहिले पाहिजे. सन २०४७ पर्यंत देश विकसित भारत म्हणून उदयास येईल व डॉ. आंबेडकर यांचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास व्यक्त करताना विकास हा सर्वसमावेशक होणे आवश्यक आहे, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते संस्थेचे दोन माजी विद्यार्थी – राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २० व्यक्तींना “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार” प्रदान करण्यात आले.
