भारताकडे १२व्या ब्रिक्स संसदीय मंचाचे अध्यक्षपद
नवी दिल्ली/ब्राझिलिया, दि. ७: ११व्या ब्रिक्स संसदीय मंचाची बैठक ४-५ जून २०२५ रोजी ब्राझील मधील ब्राझिलिया इथे झाली. यामध्ये भारतासह सर्व १० सदस्य राष्ट्रांच्या संसदेतील प्रतिनिधींचा सहभाग होता. वरिष्ठ संसदीय प्रतिनिधींसह भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले.
भारत, ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, इराण, संयुक्त अरब अमिराती, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशिया ही १० ब्रिक्स राष्ट्रे यंदा मंचात सहभागी झाली. या देशांच्या संसदीय प्रतिनिधींनी परिषदेत सक्रीय सहभाग घेतला आणि संयुक्त घोषणापत्राच्या मांडणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदार वापर, जागतिक व्यापार व अर्थव्यवस्था, आंतरसंसदीय सहकार्य, जागतिक शांतता व सुरक्षा या प्रमुख विषयांवर चर्चा आणि विचारविनिमयाच्या अनेक फेऱ्यांनंतर सामूहिक सहमती साधली गेली. भारताने मांडलेल्या मुद्द्यांना व्यापक पाठिंबा मिळाला आणि त्यांचा अंतिम संयुक्त घोषणापत्रात एकमताने समावेश करण्यात आला. विशेषतः भारताच्या दहशतवादविरोधातील ठाम धोरणाची दखल घेण्यात आली. भारताने सर्व प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यांचा कठोर शब्दांत निषेध करत ‘दहशतवादाबाबत शून्य सहनशीलते’चे धोरण स्वीकारण्याची जोरदार मागणी केली.

संयुक्त घोषणापत्रात भारतात पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आणि सदस्य देशांनी एकत्रितपणे दहशतवादाविरोधात कृती करण्याचे मान्य केले. दहशतवादी संघटनांना मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याला आळा घालणे, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण वाढवणे, नव्या तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखणे आणि तपास व न्यायप्रक्रियेत सहयोग वाढविण्याची गरज ओम बिर्ला यांनी अधोरेखित केली.

भारताचा दृष्टीकोन आणि नेतृत्वाची विशेष दखल घेण्यात आली आणि ब्रिक्स राष्ट्रांच्या संसदांनी जागतिक शांतता आणि सुरक्षिततेसाठी सर्व सदस्य राष्ट्रांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक असल्याचे मान्य केले. परिषदेच्या अखेरीस भारताला पुढील वर्षी होणाऱ्या १२व्या ब्रिक्स संसदीय मंचाच्या आयोजनाची जबाबदारी देण्यात आली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे मंचाचे अध्यक्षपद औपचारिकपणे सोपविण्यात आले.
