भारत-पाकिस्तान सीमेवरच्या तणावासंदर्भात भारताकडून वेगवान हालचाली
मुंबई, दि. ९: भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागातल्या अनेक शहरांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारतीय सेनादलांनी काल रात्री हाणून पाडला आहे. जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर इथं आंतरराष्ट्रीय सरहद्दीच्या भागातल्या लष्करी चौक्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला परंतु भारतीय लष्कराने तत्पर कारवाई करत तो राखला. जम्मू सतवारी, सांबा, आर एस पुरा आणि आर्निया येथे पाकिस्तानच्या दिशेनं आलेली ८ क्षेपणास्त्र मधेच रोखून निकामी करण्यात आली. सीमासुरक्षा दलानं काल जम्मू काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. त्यात किमान ७ दहशतवादी मारले गेले. पाकिस्तानातल्या धांधर रेंजमधून या हल्ल्याचा उगम होता असं आढळल्यावर सीमा सुरक्षा दलानं ती रेंजही उद्धवस्त केली.
दरम्यान, संघर्ष वाढवण्याची भारताची अजिबात इच्छा नसल्याचं केंद्रसरकारने स्पष्ट केलं आहे. पाकिस्तान कुरापती काढत असल्यानं त्याला चोख उत्तर देत असल्याचं सरकारने म्हटलं आहे. पाकिस्तान बरोबरच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने वेगवान पावलं उचलली आहेत. विविध स्तरांवर संरक्षण विषयक मुद्यांवर चर्चा होत असून महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत.
देशाच्या पश्चिम सीमेवरची सशस्त्र दलांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली. संरक्षण दलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदलप्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी, हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह आणि संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह या बैठकीला उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली. राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित दोवाल, केंद्रीय विमानतळ सुरक्षा दलाचे महासंचालक केंद्रीय गृहखात्याचे सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीत उपस्थित होते.
पाकिस्तानबरोबरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात जीवनावश्यक वस्तू आणि सेवांचा पुरवठा सुरळीत रहावा याकरता केंद्रसरकारने सर्व प्रकारची तयारी केली आहे. देशातल्या बँका आणि इतर वित्तीय संस्थांच्या सायबर सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज बैठक बोलावली आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांची एटीएम, रोकड जमा करण्याची आणि काढून घेण्याची यंत्रं तसंच सर्व डिजिटल सेवा पूर्णपणे कार्यरत असल्याची माहिती संबंधित बँकांच्या व्यवस्थापनानं दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी आज आरोग्य आणि औषधोपचार सुविधांची सज्जता पाहण्याकरता उच्चस्तरीय बैठक घेतली.
