पावसाळापूर्व कामांवर तसेच पावसाळी कालावधीतील नियोजनावर बारकाईने लक्ष देण्याचे नमुमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश
नवी मुंबई, दि. ०५: सद्यस्थितीत सुरू असलेल्या मान्सूनपूर्व कामांना वेग देऊन नाले व गटारे सफाई, वृक्ष छाटणी अशी कामे विहित वेळेत पूर्ण करावीत तसेच पावसाळी कालावधीमध्ये सतर्क राहून सर्व नियंत्रण कक्ष कार्यान्वित राहतील याकडे काटेकोर लक्ष द्यावे अशा स्पष्ट सूचना नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीप्रसंगी दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, शहर अभियंता शिरीष आरदवाड व इतर विभागप्रमुख, विभाग अधिकारी तथा सहा आयुक्त, कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
मान्सूनपूर्व कामांचा विभागनिहाय आढावा घेताना सुरु असलेली कामे व्यवस्थितरित्या होत असल्याबाबत संबधित अधिका-यांनी नियमित क्षेत्रीय भेटी देऊन लक्ष ठेवावे असे निर्देश आयुक्तांनी दिले. नाले व गटारे सफाई केल्यानंतर काठावर ठेवला जाणारा गाळ पुरेसा सुकल्यावर लगेच उचलून नेण्याची कार्यवाही करण्यात यावी असेही सूचित करण्यात आले.
रस्ते, पाणी पुरवठा, मलनि:स्सारण, उद्यान अशा विविध विभागांमध्ये देखभाल व दुरुस्तीसाठी नेमण्यात आलेल्या एजन्सीकडून जलद कामे करुन घेण्यात यावीत व त्यांनी केलेल्या कामाचा अभिप्राय घेण्याची प्रणाली सक्षमतेने कार्यान्वित करावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले. धोकादायक तसेच अडथळा आणणा-या वृक्षांची छाटणी करण्यावर भर देऊन रस्त्यावरील दिवाबती सुस्थितीत राहील याकडेही विशेष लक्ष देण्याचे सूचित करण्यात आले. धोकादायक इमारतींची पाहणी करुन त्यामधील अतिधोकादायक सी – 1 कॅटेगरीच्या इमारतींमधील रहिवास कोणतीही हानी होऊ नये यादृष्टीने बंद करावा तसेच धोकादायक इमारतींची यादी नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिध्द करावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले. दरड कोसळण्याचा संभव असणारी ठिकाणे तसेच नाल्यांच्या प्रवाहामध्ये अडथळा आणणा-या झोपड्या तेथून हलवाव्यात अशाही सूचना देण्यात आल्या.
मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतील १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीमेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस राज्यात तृतीय क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतांना यापुढील काळात कृती आराखड्यामधील १० मुद्यांनुसार अधिक उत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज होण्याचे सूचित करण्यात आले. यादृष्टीने कार्यालयीन कामकाजात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.
महाराष्ट्र शासनामार्फत ‘टेक-वारी’ हा महातंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह सुरु असून कार्यालयीन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने या महोत्सवातील व्याख्याने व कार्यक्रम महत्वाचे आहेत. त्यादृष्टीने महानगरपालिका कर्मचा-यांचे समूह गट करुन त्यांनी त्या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी व्हावे यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
महापालिका कामकाजात ई-ऑफिसचा वापर सुरु झाला असून तो १०० टक्के असण्याच्या दृष्टीने सर्व विभागांनी प्रभावी कार्यवाही करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. क्षेत्रीय स्तरावरील रस्ते खोदाई, त्यांची दुरुस्ती, बेवारस वाहने हटविणे अशा विभागीय स्तरावरील कामांची जबाबदारी संबधित विभाग अधिकारी व कार्यकारी अभियंता यांची असून त्यादृष्टीने त्यांनी एकत्रितपणे या बाबींवर काटेकोर लक्ष देण्याचे आयुक्तांमार्फत निर्देशीत करण्यात आले.
यावेळी सर्व विभागप्रमुखांकडून सद्यस्थितीत सुरु असलेल्या कामांची माहिती घेण्यात आली तसेच पुढील नियोजनाविषयी आयुक्तांनी मौलिक सूचना केल्या. आगामी काळात करावयाच्या प्रत्येक बाबीची संबधित विभाग प्रमुखांनी कालमर्यादा निश्चित करावी व त्यानुसार कामे पूर्ण करावीत असेही आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. शहर स्वच्छतेवर भर देत असतानाच नागरिकांमध्येही कचरा वर्गीकरण व प्लास्टिक प्रतिबंध आणि स्वच्छताविषयक इतर बाबींबाबत कायम जागरुकता राखण्यासाठी नियमित जनजागृती करणे आवश्यक असल्याचे लक्षात घेत त्यादृष्टीने कार्यवाही करावी व लोकसहभागावर भर देणारे उपक्रम वाढवावेत असे घनकचरा व्यवस्थापन विभागास सूचित करण्यात आले.
पावसाळापूर्व कामे सुव्यवस्थित होतील याकडे बारकाईने लक्ष देण्याप्रमाणेच पावसाळा कालावधीतही आवश्यक असलेल्या बाबींची आत्ताच पूर्तता करुन ठेवावी. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इतर प्राधिकरणांशी निगडीत पावसाळापूर्व कामे त्यांच्याकडून करुन घेण्यासाठी समन्वय राखावा व पाठपुरावा करावा असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विभाग प्रमुखांच्या या आढावा बैठकीप्रसंगी दिले.
