माजी प्रधानमंत्री व जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग अनंतात विलिन
नवी दिल्ली, दि. २८: माजी प्रधानमंत्री आणि जागतिक ख्यातीचे अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांना आज शोकाकुल वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला. दिल्लीच्या निगम बोध घाटावर आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शीख धर्मीय संस्कारांनुसार त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभेचे सभापती ओम बिरला, भूतान नरेश जिगमे खेसर नामग्येल वांगचुक यांच्या सह अनेक केंद्रीय मंत्री तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी यांच्यासह अनेक नेते, उच्च पदस्थ अधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
सकाळी दहा वाजता त्यांची अंत्ययात्रा काँग्रेस कार्यालयातून निघाली. फुलांनी सजवलेल्या सैन्यदलाच्या ट्रकवर त्यांचं पार्थिव ठेवण्यात आले होते. हजारोंच्या संख्येने सर्वसामान्य नागरिकही या अंत्ययात्रेत उत्स्फूर्तपणे सामील झाले होते. पावणे बाराच्या सुमारास त्यांचे पार्थिव दिल्लीच्या निगम बोध घाटावर आणण्यात आलं. यावेळी केंद्रीय मंत्री, प्रधानमंत्री, उपराष्ट्रपती आणि भूतान नरेश यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर सैन्यदलाच्या वतीनं शोकधून वाजवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर म्हणजेच मानवंदना देण्यात आली.
मनमोहन सिंग यांच्या शवपेटीवरील तिरंगा त्यांच्या कुटुंबियांकडे प्रदान करण्यात आला. त्यानतर त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी चंदनाच्या चितेवर नेण्यात आलं. यावेळी शीख धर्मातल्या प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर त्यांना हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. डॉ. मनमोहन सिंह अमर रहे च्या घोषणांनी यावेळी परिसर दुमदुमून गेला होता. डॉ. मनमोहन सिंह यांचं गुरुवारी रात्री दिल्लीच्या रुग्णालयात वृद्धापकाळानं निधन झालं. काल त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणि आज काँग्रेस कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं.
डॉ. मनमोहन सिंह यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजूजू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाबद्दल जगातल्या अनेक देशांनी आपले शोकसंदेश पाठवले आहेत. केंद्रसरकारने ७ दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे.
Source – AIR
