दिग्विजय सिंग यांच्या पराभवानंतर ‘मिरची बाबा’ यांचा शोध सुरू
भोपाळ: भोपाळ लोकसभा मतदारसंघातून मध्यप्रदेश चे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग हरल्यानंतर गायब असलेले ‘मिर्ची बाबा’ उर्फ महामंडलेश्वर स्वामी वैराग्यानंद यांना शोधण्याच्यामागे सर्व लागले आहेत. त्यांनी दिग्विजय सिंग यांच्या विजयासाठी काही दिवसांपूर्वी लाल मिर्ची चे हवन केले होते आणि जर सिंग हरले तर हवन कुंडात समाधी घेण्याची वार्ता केली होती.
वैराग्यानंद यांनी एकूण ५ क्विंटल मिरची टाकून हवन केला होता. स्थानिक लोकं आता थट्टेत म्हणत आहेत की स्वामींना आम्ही शोधत आहोत. त्यांचा फोनही बंद लागत आहे.
गुरुवारी लोकसभा निवडणुकांच्या निकालांची घोषणा झाली, ज्यात नरेंद्र मोदींची मोठी लाट देशभरात दिसली. मध्यप्रदेशात काँग्रेस ला फक्त एका जागेवर समाधान मानावं लागलं. भोपाळ लोकसभेच्या जागेवर निवडणुकीच्या मैदानात उतरलेले वरिष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.
