एकदिवस हे भाजपवाले माझा खून करून टाकतील; अरविंद केजरीवाल यांचा गंभीर आरोप
नवी दिल्ली: “आजपर्यंत माझ्यावर एवढे हल्ले झाले आहेत, कधी ऐकलं आहे का, की ७० वर्षात कोणा मुख्यमंत्र्यांवर एवढे हल्ले झाले आहेत? हे हल्ले का होत आहेत? माझा अपराध काय आहे? मी काय चूक केलीय?” असे अनेक प्रश्न उद्विग्न होऊन अरविंद केजरीवाल यांनी विचारले आहेत.
एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला मुलाखत देताना ते पुढे म्हणाले की मी शिक्षण, आरोग्य यावर चांगलं काम करत आहे, तरीही हे हल्ले का होत आहेत? नक्कीच यामागे राजकीत पक्ष विशेषतः भाजपचा हात आहे. एकदिवस हे भाजपवाले मला संपवून टाकतील, माझा खून करून टाकतील आणि म्हणतील की ‘आप’ चाच कार्यकर्ता होता जो नाराज असल्याकारणाने त्याने असे कृत्य केले.”
त्यांनी आपल्या सुरक्षेत असलेल्या सुरक्षारक्षकांवरही गंभीर आरोप केले की हे सर्व भाजपला रिपोर्टिंग करतात. इंदिरागांधीं सारखी माझी हत्या माझ्या सुरक्षेसाठी असलेल्या PSO कडून केली जाऊ शकते. त्यांनी सर्वच राजकीय पक्षांना लक्ष करत सांगितलं की यांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य या विषयावरचं राजकारणच संपवायचं आहे.
आम आदमी पार्टी चे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर गेल्याच आठवड्यात दक्षिण दिल्लीतील प्रचारसभेदरम्यान एका माथेफिरुने हल्ला केला होता.
