“दुर्लक्ष करू नका, गाफील राहू नका”; राज ठाकरे यांचे महाराष्ट्र दिनी आवाहन
आज महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात पार पडत आहे. सर्व राजकारण्यांनी आपल्या ट्विटर, फेसबुक अकाउंट वरून शुभेच्छाही दिल्या. पण महाराष्ट्र दिनी शुभेच्छांसोबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दुष्काळ व बेरोजगारी या विषयांवर पत्रक काढून आपलं मनोगत मांडत सर्वांचे लक्ष वेधले आहे. या पत्रकातील मजकूर पुढील प्रमाणे.
“सस्नेह जय महाराष्ट्र,
सर्वप्रथम तमाम मराठी जनांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
अगदी परवाच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांतील महाराष्ट्रातील मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडला. गेले काही आठवडे एकूणच वातावरण निवडणूकमय झालेलं असल्यामुळे सर्वांचच, अगदी माध्यमांच देखील दोन गंभीर विषयांकडे सपशेल दुर्लक्ष झालं. दुष्काळ आणि बेरोजगारी.
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दिवशी महाराष्ट्राला या दोन संकटांकडे दुर्लक्ष करणं परवडणारं नाही. महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती प्रचंड गंभीर आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते तर ह्यावेळचा दुष्काळ हा १९७२ च्या दुष्काळापेक्षा गंभीर आहे. एक बाजूला दुष्काळामुळे गावच्या गावं ओस पडली आहेत आणि तिथल्या लोकांचे तांडे शहरांकडे उपजीविकेच्या शोधात येत आहेत तर दुसरीकडे शहरांमध्ये फक्त असंघटित नाही तर अगदी उच्च कौशल्याधारीत व्यवसायातील तरुण-तरुणी देखील त्यांच्या नोकऱ्या गमावत आहेत. अनेक सरकारी आस्थापनांमध्येच पगार वेळेवर होत नसतील तर खाजगी उद्योगांमध्ये काय अवस्था असेल?
ह्या दोन्ही विषयात आता सरकारने त्यांच्या कामगिरीचे पोकळ दावे करण्याच्या पलीकडे जायला हवं आणि माध्यमांनीदेखील अधिक काटेकोरपणे ह्या दाव्यातील तथ्य तपासायला हवीत. निवडणूक येतील, जातील, पण त्याच्यापालिकडे जाऊन आपल्याला ह्या विषयांकडे बघायला हवं.
सर्वच क्षेत्रात अग्रणी असलेलं राज्य हा महाराष्ट्राचा लौकिक आहे, पण आपण वेळेत जागे झालो नाही तर हा लौकिक हातातून निसटू शकतो.
दुष्काळी परिस्थितीवर महाराष्ट्र सैनिक लक्ष ठेवून आहेत आणि जिथे जिथे सरकारी यंत्रणा त्यांच्या कामात दिरंगाई करत आहेत तिथे तिथे मनसे दणका देत आहेत. पण हे दोन्ही विषय इतके गंभीर आहेत की तमाम मराठी जनांनी जनमताचा रेटा उभारायला हवा. आणि त्यासाठी ‘महाराष्ट्र दिन’ ह्या शिवाय दुसरा उत्तम दिवस असूच शकत नाही. माझी महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे, की दुर्लक्ष करू नका, गाफील राहू नका.”
