मी त्याला विधिमंडळात कोणत्याही मार्गाने पाठवेन – उद्धव ठाकरे
आज शिवसेनेने अखेर पालघर लोकसभा मतदार संघातील उमेदवाराची घोषणा केली. या ठिकाणी भाजप चे खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेनेत प्रवेश देऊन त्यांना या जागेचे तिकीट देण्यात आले आहे. ही घोषणा करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, “पालघर लोकसभा मतदारसंघ हा जागावाटपात शिवसेनेकडे आहे, गेल्या पोटनिवडणुकीत मी जाहीरपणे सांगितले होते की मला श्रीनिवासला संसदेत पाठवायचे होते,
तो माझा शब्द आजही कायम आहे, मात्र या दरम्यानच्या काळात श्रीनिवासने सुद्धा मतदार संघाचा आढावा घेतला आहे, श्रीनिवास तिथे काम करतो आहे, मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीनिवासला असे वाटले की त्याला अजून तिथे काम केले पाहिजे, आधी मी विधिमंडळात काम करतो मग पुढे कसे ते ठरवू, असे त्याने सांगितले. माझा त्याला दिलेला शब्द आहे तो आहेच, आता श्रीनिवासला विधिमंडळात काम करण्याची इच्छा असेल तर मी त्याला कोणत्याही मार्गाने विधिमंडळात पाठवल्याशिवाय राहणार नाही .
आजही माझ्या मनावर दडपण आहे, कारण बाळासाहेब नेहमी सांगायचे की एखाद्याला शब्द देताना विचार करून दे, एकदा शब्द दिला की तो पाळलाच पाहिजे, हीच आमच्या कुटुंबीयांची शिवसेनेची ओळख आहे, श्रीनिवास वनगा यांनी इच्छा व्यक्त केली की मला विधिमंडळात काम करण्याची इच्छा आहे, तशी त्यांनी माझ्याकडून कमिटमेन्ट घेतली नसली तरी मी त्याला कमिटमेंट देत आहे की मी त्याला विधिमंडळात कोणत्याही मार्गाने पाठवेन.
पालघर मतदार संघात खासदार म्हणून राजेंद्र गावित यांनी काम केलेले आहे, ८/१० महिन्यांचा त्यांचा अनुभव आहे, आमची युती झाल्यामुळे या मतदार संघात इतर कोणी घेण्यापेक्षा मी गावित यांनाच शिवसेनेत घेऊन पालघर लोकसभेचे तिकीट देत आहे. अशी युती जगात एखादीच असेल ज्यात जागाही घ्या आणि उमेदवारही घ्या इतके एकमत होत असेल. त्यामुळे पालघर लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून राजेंद्र गावित यांची उमेदवारी शिवसेनेतर्फे मी जाहीर करत आहे.
साताऱ्यातून नरेंद्र पाटील यांचीही उमेदवारी मी जाहीर केली आहे, शिवसेनेच्या आता सर्व २३ उमेदवारांच्या नावाची घोषणा झालेली आहे.
