आज दुपारपासून १७ तारखेपर्यंत ‘टाक्टी’ वादळाचा महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत होणार प्रवास
हवामान Update: मध्यरात्री अरबी समुद्रावर टाक्टी नावाचं चक्रीवादळ तयार झालं असून आज सकाळी साडे पाचच्या सुमारास ते ताशी ७० ते ८० किलोमीटरच्या वेगानं घोंगावत लक्षद्वीप बेटांजवळून उत्तरेकडे निघालं. हे वादळ कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रावरून गुजरातच्या दिशेनं जाणार आहे.
१८ तारखेला ते गुजरातच्या किनाऱ्यावर पोहोचेल असा अंदाज असून आज दुपारपासून १७ तारखेपर्यंत ‘टाक्टी’ वादळाचा प्रवास महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रातून होईल.
या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आज आणि उद्या दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी अपेक्षित आहेत. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात उद्या आणि परवा या वादळाच्या प्रभावामुळे पाऊस पडेल. मात्र या काळात वादळ महाराष्ट्राच्या किनााऱ्यापासून दूर जाणारअसल्याने
पावसाचं प्रमाण काहीसं कमी राहील.
आगामी ३ दिवस समुद्र खवळलेला राहणार असल्याने मच्छीमारांसाठी धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. सध्या केरळमध्ये काही भागात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक घरांचं नुकसान झालं आहे. कालडी आणि इतर काही गावांमधल्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे.
