रेल्वे प्रवासावरून माथाडी नेते नरेंद्र पाटील यांचा ठाकरे सरकारला अल्टीमेटम
नवी मुंबई, दि.२३: माथाडी नेते व आ. नरेंद्र पाटील यांनी माथाडी व मापाडी कामगारांना रेल्वे ने प्रवास करू देण्याचे मागणी ठाकरे सरकारला केली असून जर ही मागणी मान्य झाली नाही तर उद्यापासून नवी मुंबई येथील सर्व बाजार बेमुदत बंद राहतील असा अल्टीमेटम दिला आहे. काल रात्री ८ वाजल्यापासून राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमांनुसार फक्त अत्यावश्यक सेवेतील वैद्यकीय विभागांशी निगडित कर्मचारी व रुग्णांना रेल्वे प्रवासाची परवानगी असणार आहे.
आज दुपारी काही माथाडी व मापाडी सानपाडा रेल्वे स्थानकातून आपल्या घरी परतीचा प्रवास करत होते. यावेळी स्थानकावर उपस्थित तिकीट तपासनीसांनी त्यांना अडवले. यावेळी वाद झाल्यावर माथाडी कामगारांनी आपले नेते आ. नरेंद्र पाटील यांना कळवले. काही वेळाने येथे नरेंद्र पाटील यांनी फेसबुक च्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे माथाडी कामगारांना रेल्वे ने प्रवास करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी केली.
जर ही मागणी मान्य झाली नाही तर उद्यापासून नवी मुंबई बाजार समितीशी संलग्न सर्व बाजार बेमुदत बंद राहतील असा इशारा दिला. उद्या जर बाजार बंद राहिला तर भाजीपाला, फळे यांचे दर कडाडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
