‘एसआयआर’ प्रणालीच्या माध्यमातून मतांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न झाल्याचा ममता बॅनर्जींचा दावा
कोलकाता, दि. ४ : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक कामगिरी करत तृणमूल काँग्रेसच्या दीर्घकालीन सत्तेला मोठा धक्का दिला आहे. राज्यात भाजपने आघाडी घेत निर्णायक वाढ नोंदवली असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही भवानीपूर मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपचे नेते शुभेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा तब्बल १५ हजार १११ मतांनी पराभव केला असल्याची माहिती समोर आली आहे. या निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजपमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे, तर तृणमूल काँग्रेसने निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच पश्चिम बंगालमध्ये भाजपने मोठी आघाडी घेतली होती. उपलब्ध आकडेवारीनुसार भाजप सुमारे १९३ जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र समोर आले, तर तृणमूल काँग्रेसला सुमारे ९४ जागांवर आघाडी मिळाल्याचे दिसून आले. राज्यातील राजकीय समीकरणात झालेला हा मोठा बदल मानला जात आहे. मागील निवडणुकीत अत्यल्प जागांवर मर्यादित असलेल्या भाजपने यावेळी राज्यभरात मोठी घोडदौड करत सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरू केली आहे.
भवानीपूर मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजपचे प्रभावी नेते शुभेंदु अधिकारी यांच्यात अत्यंत अटीतटीची लढत झाली. अखेर या लढतीत शुभेंदु अधिकारी यांनी विजय मिळवत मोठा राजकीय संदेश दिला. निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. शुभेंदु अधिकारी यांनी कार्यकर्त्यांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला आणि हा विजय बंगालच्या जनतेच्या एकजुटीचा असल्याचे सांगितले.
दरम्यान, निकालानंतर ममता बॅनर्जी यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केले. मतमोजणी केंद्रात आपल्याला अडवण्यात आले, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की केली तसेच आपल्या पोलिंग एजंटलाही आत प्रवेश दिला गेला नाही, असा आरोप त्यांनी केला. मतमोजणीदरम्यान अनेक ठिकाणी गोंधळ झाल्याचा दावा करत त्यांनी निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ संदेशात ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मतमोजणी प्रतिनिधींनी केंद्र सोडू नये कारण हा विरोधकांचा डाव असू शकतो. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये विरोधकांना आघाडीवर दाखवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. काही ठिकाणी मतमोजणी थांबवण्यात आली असून कल्याणी परिसरात काही यंत्रांमधील आकडेवारी जुळत नसल्याचेही त्यांनी म्हटले. केंद्रीय सुरक्षा दल आणि निवडणूक यंत्रणा तृणमूल काँग्रेसवर दबाव टाकत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
ममता बॅनर्जी यांनी कार्यकर्त्यांना निराश न होण्याचे आवाहन करत मतमोजणीच्या अनेक फेऱ्या बाकी असल्याचे सांगितले. “सूर्यास्तानंतर विजय आपलाच होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘एसआयआर’ प्रणालीच्या माध्यमातून मतांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावाही त्यांनी केला. निवडणूक आयोग आणि केंद्रीय यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
या निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगाल मध्ये प्रथमच सत्ता स्थापनेच्या उंबरठ्यावर पोहोचत मोठी राजकीय कामगिरी केली आहे. मागील काही वर्षांत राज्यात संघटनात्मक पातळीवर केलेल्या विस्ताराचा फायदा भाजपला मिळाल्याचे मानले जात आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार भाजपच्या मतांच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली असून ती सुमारे ४४.७७ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत घट झाल्याचे दिसत आहे.
राज्यातील अंतिम निकाल आणि सत्तास्थापनेचे चित्र स्पष्ट होण्याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, निवडणूक प्रक्रियेबाबत करण्यात आलेल्या आरोपांमुळे पश्चिम बंगालमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
