महाराष्ट्रातील महामार्ग प्रकल्पांना गती
नवी दिल्ली, दि. ४ : महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग जाळे अधिक सक्षम, वेगवान आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील प्रस्तावित अतिवेगवान मार्गिका, सर्वाधिक वर्दळीचे महामार्ग, सहा पदरीकरण प्रकल्प तसेच बीओटी तत्वावरील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
राज्यातील औद्योगिक, व्यापारी आणि लॉजिस्टिक संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी विविध महामार्ग प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती देण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. राष्ट्रीय महामार्गांच्या माध्यमातून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील संपर्कव्यवस्था अधिक मजबूत करण्याचे नियोजन केंद्र सरकारकडून करण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
या बैठकीत नागपूर-भंडारा मार्गाच्या सहा पदरीकरणासह तळोदा-बुऱ्हाणपूर चौपदरीकरण, दुर्ग-गडचिरोली-मंचेरियाल मार्गिका, गडचिरोली-कांकेर अर्थात रायपूर-विशाखापट्टणम मार्गिका, ग्वाल्हेर-नागपूर मार्गिका आणि नागपूर-हैदराबाद मार्गिका यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर चर्चा झाली. याशिवाय भंडारा-रायपूर विभागाचे सहा पदरीकरण, लखनादौन-दुर्ग-रायपूर मार्गिका, नागपूर-अमरावती विभागाचे सहा पदरीकरण आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमा ते नागपूर बायपास-बोरखेडी टप्प्याच्या कामाचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.
पुणे-सातारा महामार्गाच्या सहा पदरीकरणालाही बैठकीत प्राधान्य देण्यात आले. मुंबई-पुणे-सातारा-कोल्हापूर या औद्योगिक पट्ट्यातील वाढती वाहतूक लक्षात घेता या मार्गाचा विस्तार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. भविष्यातील वाहतूक दाब कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
बैठकीत महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांवरील एकूण ५२७ किलोमीटर लांबीच्या नऊ बीओटी प्रकल्पांचाही सखोल आढावा घेण्यात आला. यात शिरूर-अहिल्यानगर, अहिल्यानगर-वडाळा, वडाळा-छत्रपती संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर-जालना आणि जालना-वाटूर या चौपदरीकरण प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच नांदेड-नरसी-देगलूर मार्गाचे चौपदरीकरण आणि द्विपदरीकरण, जाम-वरोरा, वरोरा-चंद्रपूर-बामणी तसेच मलकापूर-चिखली मार्गिकांच्या विकासाबाबतही चर्चा झाली.
विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागातील रस्ते संपर्क सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागांना राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कशी जोडल्यामुळे औद्योगिक विकास, खनिज वाहतूक, कृषी बाजारपेठांशी संपर्क आणि पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
बैठकीत महामार्ग प्रकल्पांच्या कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणी, जमीन संपादन प्रक्रिया, पर्यावरणीय मंजुरी आणि निधी वितरण यांचाही आढावा घेण्यात आला. प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या.
राज्यातील वाढती वाहतूक, औद्योगिक विस्तार आणि आर्थिक विकास लक्षात घेता आधुनिक महामार्गांचे जाळे उभारणे अत्यावश्यक असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. या प्रकल्पांमुळे प्रवासाचा वेळ कमी होण्यासोबतच इंधन बचत, अपघातांमध्ये घट आणि व्यापार-उद्योगांना गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
