जुन्या ४६ आणि नव्याने नियुक्त ३५ कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केल्याचे प्रकरण तसेच ५० गुंठे जमीन व्यापारी संघटनेला दिल्याची तपासणी
कल्याण, दि. २७ : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचारी वेतन आणि जमीनवाटपाशी संबंधित दोन महत्त्वाच्या निर्णयांवर आता प्रशासकीय चौकशी होणार आहे. प्रशासकांच्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासह बाजार समितीची ५० गुंठे जमीन व्यापारी संघटनेला देण्याच्या प्रकरणाची कागदपत्रांसह तपासणी करण्याचे निर्देश पणन संचालक संजय कदम यांनी दिले आहेत. या चौकशीचा अहवाल एका महिन्यात सादर करावा लागणार आहे.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाबाबत दाखल झालेल्या तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम ४० (ब) आणि त्याअंतर्गत १९६७ च्या नियमावलीतील नियम ११७ नुसार चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
दोन निर्णयांची होणार तपासणी
चौकशीचा पहिला मुद्दा बाजार समितीच्या जुन्या ४६ कर्मचाऱ्यांसह १८ एप्रिल २०२५ रोजी सरळसेवेने नियुक्त झालेल्या ३५ कर्मचाऱ्यांना प्रशासकांच्या कार्यकाळात सातवा वेतन आयोग लागू करण्याशी संबंधित आहे. हा निर्णय कोणत्या आधारे घेण्यात आला, त्याची प्रक्रिया आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे.
दुसरा मुद्दा बाजार समितीच्या सर्वे क्रमांक २८२ आणि २८४ मधील एकूण ५० गुंठे जमिनीशी संबंधित आहे. ही जमीन लक्ष्मी मार्केट भाजीपाला व्यापारी संघटनेला देण्याच्या निर्णयाचीही चौकशी केली जाणार आहे.
आदिनाथ दगडे यांच्याकडे चौकशीची जबाबदारी
या प्रकरणाच्या तपासासाठी कोकण विभागाचे सहनिबंधक आदिनाथ दगडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित दोन्ही विषयांची सविस्तर छाननी करून प्रत्येक मुद्द्यावर स्पष्ट अभिप्राय नोंदवण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. निष्कर्षांच्या समर्थनार्थ आवश्यक कागदपत्रे जोडून अहवाल पणन संचालनालयाकडे सादर करावा लागणार आहे.
चौकशीसाठी आवश्यक असलेली माहिती, नोंदी, अहवाल आणि इतर कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बाजार समितीच्या सचिवांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय आणि जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया यासंबंधीच्या प्रशासकीय नोंदीही तपासल्या जाणार आहेत.
एका महिन्याच्या कालमर्यादेत अहवाल सादर करण्याचे निर्देश असल्याने या चौकशीकडे आता बाजार समितीतील संबंधित कर्मचारी, व्यापारी संघटना आणि तक्रारदारांचे लक्ष लागले आहे. चौकशीतील निष्कर्षांनंतर या दोन्ही निर्णयांबाबत पुढील प्रशासकीय कार्यवाही स्पष्ट होणार आहे.

