Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

उरण तालुक्यातील मौजे चाणजे येथील शेतकऱ्यांना समुद्रातील पाण्यामूळे भेडसावतेय नापिकीची समस्या

फ्लॅप गेट कायमस्वरूपी ठेवण्याची ग्रामस्थांची मागणी

उरण, दि.२३(विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील द्रोणागिरी धारण तलाव क्रमांक २ समोरील मौजे चाणजे येथील शेतजमीन समुद्राच्या पाण्यापासून सुरक्षित राहण्यासाठी पाईप आउटलेट वर सिडकोकडून बसविलेले फ्लॅप गेट कायमस्वरूपी ठेवण्यात यावेत अशी स्थानिक ग्रामस्थ, शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यानुसार ग्रामस्थांचे व शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन सदर फ्लॅप गेट कायमस्वरूपी ठेवण्यात यावेत यासाठी चाणजे शेतकरी संघर्ष समितीतर्फे रायगड जिल्हाधिकारी, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक कांदळवन कक्ष मुंबई, कोकण आयुक्त नवी मुंबई, व्यवस्थापकीय संचालक सिडको नवी मुंबई, आमदार-उरण यांना पत्रव्यवहार करून निवेदन देण्यात आले आहे.

द्रोणागिरी धारण तलाव क्रमांक २ समोरील मौजे चाणजे, तालुका उरण येथील शेत जमीन ही शेतकर्‍यांच्या स्वतःच्या मालकीचे असून मौजे चाणजे सर्वे नंबर ४१८, ४२१, ४२२, ४२३ ह्या जमीनी संपादित न करता या जमिनीवर सिडकोकडून पाईप आउटलेट बांधण्यात आले आहे. परंतु पाईप आउटलेटची प्लॅप गेट काढल्यामुळे समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणात शेतजमीनीत शिरत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे अस्तित्व संपुष्टात येत आहे. पिकत्या जमिनी नापीक बनत आहे. शिवाय यासंदर्भात शेतकऱ्यांना शासनाकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळत नाही. या समस्ये संदर्भात सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येत ९/३/ २०२१ रोजी चाणजे शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून संबंधित जमिनीचे होणारे नुकसान, त्याचे फोटो, शेतकऱ्यांचे नाव व सहि, सातबारा उतारा आदी सर्व पुरावे शासकीय दप्तरी सादर केले होते. सादर केलेल्या पुराव्याच्या आधारे सिडकोकडून २०२१ मधील मे महिन्यामध्ये संबंधित पाईप आउटलेटची ८०% प्लॅप गेट लावण्यात आली. परिणामी शेतकऱ्यांच्या जमिनीत समुद्राचे पाणी कमी प्रमाणात शिरत आहेत. शेत जमीन सुरक्षितेसाठी व होणाऱ्या प्रचंड नुकसानापासून वाचण्यासाठी सिडकोकडून लावण्यात आलेले ८०% प्लॅप गेट १००% लावण्याचे आदेश देऊन ती कायमस्वरूपी (१२ महिने) ठेवण्यात यावी अशी मागणी सर्व शासकीय विभागात पत्रव्यवहाराद्वारे करण्यात आल्याची माहिती चाणजे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश म्हात्रे यांनी दिली. खाडी वाचावी, कांदळवन वाढावे यासाठी ज्या NGO आणि संस्था फ्लॅप गेट काढण्यासाठी विभागीय कोकण आयुक्त कार्यालयात विनवण्या करीत आहेत त्यांना अविनाश म्हात्रे यांनी “आमच्या ७/१२ धारक शेतकऱ्यांच्या स्वतःच्या मालकीच्या शेत जमिनीत समुद्राचे पाणी शिरून कांदळवन तयार झाले तर आमच्या शेतकऱ्यांना NGO किंवा संस्था नुकसान भरपाई देणार आहेत का ?” असा खोचक सवाल केला आहे.

चाणजे खाडी येथे जवळजवळ २५० एकर शेतकऱ्यांची जमीन समुद्राच्या पाण्यापासून वाचविण्यासाठी सर्व शेतकरी एक झाले आहेत. सप्टेंबर महिन्यानंतर पाईप आउटलेट वरील लावलेले फ्लॅट गेट काढण्यात येणार आहेत. समुद्राचे पाणी अडवण्यासाठी लावलेले ८० टक्के फ्लॅप गेट जून महिन्यात लावण्यात आले आहेत. परंतु सिडको प्रशासनाला फक्त पावसाळा हंगाम पुरतेच फ्लॅप गेट लावण्याचे आदेश कोकण विभाग आयुक्त यांनी दिल्यामुळे ते सप्टेंबर महिन्यानंतर पुन्हा काढण्यात येणार आहेत. २०२१ च्या जून महिन्यात लावण्यात आलेले ८०% फ्लॅप गेट सप्टेंबर महिन्यानंतर देखील न काढता ते अखंड बाराही महिने ठेवण्यात यावे तसेच १००% फ्लॅप गेट लावण्यात यावेत जेणेकरून शेतकऱ्यांची सुपीक जमीन/शेती व्यवसाय सुरक्षित राहतील यासंदर्भात प्रशासनाच्या विविध विभागात पत्रव्यवहार करण्यात आले आहे.
– अविनाश म्हात्रे
अध्यक्ष – चाणजे शेतकरी संघर्ष समिती

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *