Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 9372236332 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 9372236332

राज्यस्तरीय उल्लास मेळावा-२०२४ चे उद्घाटन संपन्न

उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

पुणे, दि. ३० : देशाच्या प्रगतीसाठी साक्षरता अभियान खूप महत्वाचे असून केंद्र पुरस्कृत उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घेवून राज्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे येथे आयोजित केंद्र पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत राज्यस्तरीय उल्लास मेळावा-२०२४ च्या उद्घाटन प्रसंगी मंत्री केसरकर बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचे केंद्रीय सहसचिव अर्चना शर्मा-अवस्थी, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, राज्य प्रकल्प संचालक आर. विमला, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार आदी उपस्थित होते.

मंत्री केसरकर म्हणाले, केंद्र सरकार संपूर्ण देश १०० टक्के साक्षर व्हावा यासाठी नव भारत साक्षरता कार्यक्रम राबवित आहे. पूर्वी स्वाक्षरी काढावयास आली की व्यक्ती साक्षर झाला अशी साक्षरतेची व्याख्या होती. आता अक्षर ओळखीबरोबर आकड्यांची ओळख देखील नव साक्षर नागरिकांना व्हावी, यासाठी प्रयत्न करावेत. नागरिकांना साक्षर बनविण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांचा खूप मोठा वाटा आहे. या कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना अधिकचे गुण देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा. जेणे करुन विद्यार्थ्यांच्या गुणांकनामध्ये त्या गुणांचा उपयोग होईल.

राज्यातील संघटनांनी नव भारत साक्षर कार्यक्रमात स्वतःहून सहभाग घेवून निरक्षर नागरिकांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न करावेत. अनेक जिल्ह्यांनी या कार्यक्रमांतर्गत उद्दिष्टापेक्षा अधिकचे काम केले आहे, असे सांगून यापुढेही सर्वांनी असेच कार्य करण्याचे आवाहन मंत्री केसरकर यांनी केले.

अवस्थी म्हणाल्या, उल्लास- नव भारत साक्षरता कार्यक्रमाचा मुख्य उद्देश देश ९५ टक्के साक्षर करणे हा आहे. नव साक्षर लोकांना वाचणे, लिहिणे याच बरोबर गणित, बँकेचे व्यवहार येणे आवश्यक आहे. भारतातील नागरिक ८० टक्के साक्षर आहेत तर महाराष्ट्र राज्य ८७ टक्के साक्षर आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रात हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे राबविण्यात येत आहे. आज रोजी महाराष्ट्रात ८० लाख नागरिक निरक्षर आहेत, असे सांगून साक्षरतेची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कुंदन म्हणाल्या, राज्यातील ८ लाख नागरिकांनी या कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. निरक्षर नागरिकांना साक्षर बनवून त्यांचे सक्षमीकरण होणे खूप महत्वाचे आहे. राज्य शासन अनेक महत्वपूर्ण योजना राबवित आहे. साक्षरतेतून या योजनांची माहिती मिळण्यास मदत होईल. नागरिकांना साक्षरतेचे महत्व पटवून सर्वांनी हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रास्ताविकात शिक्षण संचालक योजना डॉ. महेश पालकर यांनी राज्यातील उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमाची  माहिती दिली. यावेळी राज्य विशेष अंक, शिक्षणगाथा पुस्तक व बालभारतीच्या १२ पुस्तकांचे प्रकाशन तसेच उल्लेखनीय कार्य करणारे जिल्हे, नव साक्षर व स्वयंसेवक यांचा सत्कार मंत्री केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांच्यासह राज्यातील शिक्षणाधिकारी, प्राचार्य, नव साक्षर, साक्षर, शिक्षक, स्वयंसेवक आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *