Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अलिबाग, मुरुड-जंजिरा आणि श्रीवर्धनला ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची घोषणा

मुंबई : रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड-जंजिरा आणि श्रीवर्धन या पर्यटनस्थळांना ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात येत असल्याची घोषणा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. पर्यटनमंत्री ठाकरे आणि पर्यटन राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या पुढाकारातून मुंबई, पुण्यापासून जवळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील या पर्यटनस्थळांच्या विकासास चालना देण्याच्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत हा निर्णय घेण्यात आला आहे.

या पर्यटनस्थळांना आता ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्याने शासनामार्फत येथे विविध पर्यटन सुविधा, पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येईल.

यामुळे येथील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असे पर्यटनमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील अलिबाग हे विस्तृत समुद्रकिनारा लाभलेले निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे.

समुद्रातील शिवकालिन ऐतिहासिक कुलाबा किल्ला, सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांची समाधी, १५० वर्षे जुनी ब्रिटीशकालीन वेधशाळा, श्रीकनकेश्वर, श्रीसिद्धेश्वर, श्रीरामेश्वर, श्रीबालाजी मंदिर, श्री काशी विश्वेश्वराचे मंदीर इत्यादी शिवकालीन पुरातन मंदीरे, ज्यू समाजाचे प्रार्थना मंदीर, हिराकोट किल्ला व तलाव, खांदेरी व उंदेरी किल्ले इत्यादी ऐतिहासिक पर्यटनस्थळे येथे आहेत.

मुरुड – जंजिरा नगरीची भौगोलिक स्थिती आकर्षित करणारी आहे. शहरात प्रवेश करतानाच नवाबी नजाकतीचा राजवाडा दृष्टीस पडल्यानंतर पुढे अथांग अरबी समुद्र आहे.

समुद्रात पद्मदूर्ग आणि विलोभनीय मुरुड समुद्र किनारा दृष्टीस पडतो. शहराच्या वेशीवर श्री कोटेश्वरी ग्रामदेवतेचे तर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी श्री भोगेश्वर मंदीर तसेच श्री लक्ष्मी नारायण व इतर पुरातन मंदीरे आहेत.

मुरुड – जंजिरा हा ऐतिहासीक जलदुर्ग असून या जलदुर्गास देश-विदेशातील लाखो पर्यटक भेट देतात. जवळच असलेले फणसाड अभयारण्य आणि खोकरी टॉम्ब हेही पर्यटकांची आकर्षणस्थळे आहेत.

श्रीवर्धन नगरपरिषद क्षेत्रात कालभैरव, जीवनेश्वर, सोमजादेवी, कुसुमावती इत्यादी देवस्थाने व पेशवे मंदीर इत्यादी वास्तू पेशवाई किंवा त्या अगोदरच्या काळातील आहेत. तसेच श्रीवर्धन येथे सुमारे ४ किमी लांबीचा  समुद्र किनारा असून येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देतात.

राज्य शासनामार्फत कोकणातील पर्यटन विकासाला चालना देण्यात येत आहे. यासाठी राज्य शासनामार्फत बीच शॅक धोरण मंजूर करण्यात आले आहे. या धोरणांतर्गत रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील वर्सोली समुद्रकिनारा आणि श्रीवर्धन येथील हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्याचा विकास करण्यात येणार आहे.

कोकणातील इतर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांचाही या धोरणांतर्गत विकास करण्यात येणार आहे. सिंधुदूर्गमध्ये हॉटेल ताज ग्रुप गुंतवणूक करत असून चिपी विमानतळही लवकरच सुरु होत आहे.

आता रायगड जिल्ह्यातील ३ पर्यटनस्थळांना ब वर्गाचा दर्जा देण्यात येत असून या पर्यटनस्थळांना या दर्जाप्रमाणे सोयी-सुविधा व निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मंत्री ठाकरे यांनी सांगितले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *