Milind Kadam M4B
पुरुष लाभार्थ्यांकडूनही पैसे परत घेण्यासाठी प्रस्ताव; महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली माहिती
मुंबई, दि. १३ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात अपात्र लाभार्थ्यांना दिलेल्या आर्थिक सहाय्याच्या वसुलीची प्रक्रिया राज्य शासनाने अधिक गतीने सुरू केली आहे. विशेषतः योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुष लाभार्थ्यांकडून दिलेली रक्कम परत मिळवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने प्रस्ताव तयार केला असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
राज्य शासनाने दि. २८ जून २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. मात्र, अंमलबजावणीदरम्यान काही पुरुष तसेच काही शासकीय महिला कर्मचाऱ्यांनीही चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर शासनाने अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू केली आहे.
याबाबत मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, “लाडकी बहीण योजनेतून लाभ मिळवणाऱ्या पुरुषांकडून पैसे परत करण्याच्या दृष्टिकोनातून महिला व बालविकास विभागाच्या वतीनं प्रस्ताव करण्यात आलेला आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं की जे पुरुष आहेत त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाणार आहेत, त्या संदर्भातील प्रक्रिया सुरु करत आहोत.”
शासकीय कर्मचारी लाभार्थ्यांकडून रक्कम परत घेण्याबाबतची कार्यवाही यापूर्वीच सुरू झाल्याचे स्पष्ट करत त्या म्हणाल्या, “शासकीय कर्मचाऱ्यांकडून पैसे परत घेण्याची प्रक्रिया आठ दहा महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आलेली आहे. ती रक्कम ट्रेझरीकडे जमा होते, ती विभागाकडे परत जमा होत नाही.”
राज्य शासनाच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांची संख्या सध्या सुमारे १ कोटी ६७ लाख आहे. लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत राहावी आणि अपात्र लाभार्थी वगळता यावेत, यासाठी शासनाने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली होती. या प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली असली तरीही सुमारे ६२ लाख लाभार्थी महिलांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही.
योजनेच्या अटींनुसार लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. पडताळणीनंतर अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या सुमारे १६ लाख लाभार्थ्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे.
याशिवाय, कुटुंबातील एखादी व्यक्ती शासकीय सेवेत असतानाही योजनेचा लाभ घेतलेल्या सुमारे ४ लाख ४२ हजार लाभार्थी अपात्र ठरले आहेत. तसेच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे ३ लाख ६० हजार महिलांनीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले असून त्यांनाही अपात्र घोषित करण्यात आले आहे.
याचबरोबर, एका कुटुंबातून दोनपेक्षा अधिक सदस्यांनी योजनेचा लाभ घेतल्याची सुमारे २ लाख ५० हजार प्रकरणे समोर आली असून, अशा लाभार्थ्यांनाही अपात्र ठरविण्यात आले आहे.
राज्य शासनाकडून विविध शासकीय डेटाबेस, उत्पन्नाची माहिती, सेवा नोंदी आणि इतर कागदपत्रांच्या आधारे लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असून, पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी ही प्रक्रिया अधिक काटेकोरपणे राबविण्यात येत आहे. अपात्र लाभार्थ्यांकडून शासनाची रक्कम परत मिळविण्यासाठी आवश्यक प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पुढे नेण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
