अवैध प्रवासी ॲप्सविरोधात कारवाईसाठी विशेष समिती स्थापन
मुंबई, दि. १३ : राज्यातील खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी मनमानी भाडेवाढ, सणासुदीच्या काळात आकारले जाणारे अवाजवी तिकीट दर तसेच अनधिकृत मोबाईल ॲप्समार्फत होणारी प्रवाशांची आर्थिक पिळवणूक याविरोधात राज्य शासनाने कठोर भूमिका घेतली आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच प्रवाशांच्या तक्रारींवर दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
मंत्रालयात आयोजित बैठकीत त्यांनी सह परिवहन आयुक्त आणि सुराज्य अभियानातील तीन प्रतिनिधींचा समावेश असलेली समिती गठित करण्याची घोषणा केली. या बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर तसेच सुराज्य अभियान संघटनेचे अभिषेक मुरुकटे, अरविंद पानसरे आणि सुनील हनवट उपस्थित होते.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, खासगी बस वाहतूक क्षेत्रात प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारले जाण्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहेत. विशेषतः सण-उत्सव, सुट्ट्या आणि गर्दीच्या काळात काही ट्रॅव्हल्स कंपन्या तिकीट दरात मोठी वाढ करून प्रवाशांची आर्थिक लूट करत असल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय अनेक कंपन्या अनधिकृत मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून बुकिंग करत असल्याने शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत आहे.
या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेली समिती खासगी बस भाडेनियमन, अवैध बुकिंग ॲप्सवर नियंत्रण, प्रवासी तक्रार निवारण व्यवस्था अधिक सक्षम करणे आणि भविष्यातील नियमनासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत सविस्तर अहवाल तयार करणार आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार असून, सुचविलेल्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल, असेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
“प्रवाशांची आर्थिक फसवणूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. नियमबाह्य पद्धतीने तिकीट दर वाढवणाऱ्या आणि बेकायदेशीर ॲप्सच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या वाहतूकदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
राज्यातील बसस्थानकांवरील प्रवासी सुविधा अधिक प्रभावी करण्यासाठी प्रत्येक बसस्थानकावर तक्रार नोंदविण्यासाठी संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. तसेच राज्यातील बदललेल्या गावांच्या नावांबाबत आणि शुद्ध मराठी भाषेच्या वापराबाबत परिवहन विभागाने स्वतंत्र परिपत्रक जारी करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान, एसटी बसस्थानके आणि बसमधील अस्वच्छतेबाबत प्रवाशांकडून वारंवार तक्रारी येत असल्याने स्वच्छता मोहिमेला गती देण्यात येणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. बसस्थानकांचा कायापालट करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यात येत असून, दि. १ जून २०२६ पासून राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे प्रवाशांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देणे ही परिवहन विभागाची प्राथमिक जबाबदारी असून, त्यासाठी शासन सर्वंकष पावले उचलत असल्याचे परिवहन मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
