सुमारे ३५ कोटींचा साठा जप्त, १२ जणांना अटक
मुंबई/चेन्नई, दि. २८: धोकादायक आणि प्रतिबंधित वस्तूंच्या अवैध आयातीविरोधात महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) देशभरात सुरू ठेवलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. चेन्नई बंदर आणि मुंबई परिसरात करण्यात आलेल्या सलग कारवाईत चिनी बनावटीच्या फटाक्यांच्या तस्करीचे संघटित जाळे उध्वस्त करण्यात आले असून सुमारे ३५ कोटी रुपये किमतीचे चिनी बनावटीचे फटाके जप्त करण्यात आले आहेत. या संपूर्ण कारवाईदरम्यान एकूण १२ जणांना अटक करण्यात आली असून तस्करीसाठी वापरण्यात आलेल्या पद्धतीने तपास यंत्रणांनाही धक्का बसला आहे.
डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई बंदरातून भारतात मोठ्या प्रमाणावर चिनी बनावटीचे फटाके आणि आतषबाजीचे साहित्य आणण्याचे दोन स्वतंत्र प्रयत्न उधळून लावण्यात आले. या कारवाईत चीनमधून आलेले दोन ४० फूट लांबीचे कंटेनर संशयाच्या आधारे ताब्यात घेण्यात आले. आयात कागदपत्रांमध्ये या कंटेनरमध्ये ‘ट्रॉली बॅग्ज’ आणि ‘स्प्रेअर्स’ असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, सखोल तपासणी केल्यानंतर दर्शनी मालाच्या मागे अत्यंत कौशल्याने लपवून ठेवलेली सुमारे ४६ हजार पाकिटे चिनी बनावटीच्या फटाक्यांची आणि आतषबाजीच्या साहित्याची असल्याचे उघड झाले.
याच तपासादरम्यान डीआरआयला आणखी एका मोठ्या तस्करीची माहिती मिळाली. या प्रकरणात चेन्नई सीमाशुल्क विभागाच्या सहकार्याने १८.७ मेट्रिक टन चिनी फटाक्यांची बेकायदेशीर आयात करणाऱ्या सिंडिकेटचा पर्दाफाश करण्यात आला. तपासात असे निष्पन्न झाले की, प्रतिबंधित माल असलेला कंटेनर सीमाशुल्क विभागाची आवश्यक परवानगी न घेता कंटेनर फ्रेट स्टेशनमधून बेकायदेशीररीत्या बाहेर काढण्यात आला होता. त्यानंतर त्यामधील फटाके उतरवून त्याजागी दुसरा माल भरून कंटेनर पुन्हा मूळ ठिकाणी आणण्यात आला. या संपूर्ण गैरप्रकारात कंटेनर फ्रेट स्टेशनमधील एका कर्मचाऱ्याचा सक्रिय सहभाग असल्याचेही उघड झाले. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यासह दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
विदेशी व्यापार धोरणानुसार फटाक्यांच्या आयातीवर कठोर निर्बंध आहेत. अशा प्रकारच्या वस्तू भारतात आयात करण्यासाठी विदेशी व्यापार महासंचालनालय तसेच पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटना यांच्याकडून आवश्यक परवाने घेणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन करून तस्करीमार्फत मोठ्या प्रमाणावर धोकादायक साहित्य भारतात आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे.
डीआरआयने यापूर्वीही मे २०२६ पासून मुंबई परिसरात अनेक धाडी टाकून १०० मेट्रिक टनांहून अधिक चिनी बनावटीचे फटाके जप्त केले होते. त्या मोहिमेचा पुढचा टप्पा म्हणून करण्यात आलेल्या ताज्या कारवाईत आणखी मोठा साठा हस्तगत करण्यात आला आहे.
डीआरआयच्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या सर्व कारवायांमध्ये मिळून सुमारे ३५ कोटी रुपये किमतीचे चिनी बनावटीचे फटाके जप्त करण्यात आले असून या संपूर्ण तस्करी साखळीशी संबंधित १२ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून तस्करीच्या संपूर्ण जाळ्यामागील सूत्रधार, आर्थिक व्यवहार आणि देशभरातील वितरण साखळीचा शोध घेण्याचे काम तपास यंत्रणांकडून सुरू आहे.
धोकादायक आणि प्रतिबंधित वस्तूंच्या अवैध आयातीविरोधातील कारवाई पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत डीआरआयने दिले असून सीमाशुल्क विभाग आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या समन्वयातून अशा तस्करीविरोधात कठोर पावले उचलली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
