सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते सदस्यत्वाची शपथ
मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित दहा सदस्यांचा शपथविधी सोहळा आज विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विधानपरिषद सभापती Ram Shinde यांनी सर्व सदस्यांना विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली.
या शपथविधी सोहळ्यास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई तसेच आमदार रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आज सदस्यत्वाची शपथ घेणाऱ्यांमध्ये डॉ. नीलम गोऱ्हे, ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू, अंबादास दानवे, डॉ. प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद शांताराम जठार, झीशान झिआउद्दीन सिध्दीकी, माधवी संजय नाईक, सुनिल विनायक कर्जतकर, विवेक बिपिनदादा कोल्हे आणि संजय नथ्थुजी भेंडे यांचा समावेश होता.
विधानसभा सदस्यांद्वारे झालेल्या द्विवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा हा शपथविधी सोहळा अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. सभापती प्रा. राम शिंदे यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच त्यांच्या आगामी संसदीय कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
राज्यातील विधिमंडळाच्या कामकाजात या नव्या सदस्यांच्या सहभागामुळे विविध प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे चर्चा होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. विधानपरिषदेच्या कामकाजात अनुभवी तसेच नवोदित सदस्यांचा समतोल निर्माण झाल्याने आगामी अधिवेशनात विविध विषयांवर सखोल चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, विधान भवन परिसरात सकाळपासूनच राजकीय नेते, कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. शपथविधीनंतर अनेक सदस्यांनी सभागृह परिसरात मान्यवरांशी संवाद साधत नव्या जबाबदारीबद्दल भावना व्यक्त केल्या.
