Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘तुकडे-तुकडे’ गँगच्या कानाखाली अखंड हिंदुस्थानच्या नकाशाचा जाळ उठवला पाहिजे : सामनातून सेनेचा भाजपला टोला

‘तुकडे-तुकडे’ गँगच्या कानाखाली अखंड हिंदुस्थानच्या नकाशाचा जाळ उठवला पाहिजे : सामनातून सेनेचा भाजपला टोला

गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या दिल्लीतील ‘जेएनयू’ विद्यापीठातील वादग्रस्त हल्ल्याचे वादळ अद्याप क्षमण्याची चिन्हे दिसत नाहीत. या वादाबाबत आज शिवसेनेने आपल्या सामना या मुखपत्राच्या माध्यमातून मोदी सरकारचे कान टोचले आहेत. यात म्हटले आहे की, “देशाचे तुकडे पाडण्यासंदर्भात घोषणाबाजी करणाऱ्यांच्या विरोधात प्रति घोषणाबाजी करण्यापेक्षा ‘तुकडे-तुकडे’ गँगच्या कानाखाली अखंड हिंदुस्थानच्या नकाशाचा जाळ उठवला पाहिजे व त्यालाच आम्ही देशभक्ती म्हणतो. जनरल नरवणे यांनी त्याच दिशेने पाऊल टाकण्यासाठी केंद्राकडे आदेश मागितले आहेत. न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता या तत्त्वांचे रक्षण करण्यासाठी आमचे लष्कर कटिबद्ध आहे. पाकिस्तानी लष्कराप्रमाणे घुसखोरी करणे हा आमच्या लष्कराचा पुरुषार्थ नाही. देशाच्या संसदेने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचा आदेश लष्करप्रमुखांनी मागितला आहे. केंद्र सरकारने आता माघार घेऊ नये. ‘तुकडे तुकडे गँग’ला धडा शिकवण्याचा हाच उत्तम मार्ग आहे!”

सविस्तर अग्रलेख पुढीलप्रमाणे

हिंदुस्थानचे नवे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी पदभार स्वीकारताच मराठी बाणा दाखवून दिला आहे. जनरल नरवणे यांनी नवी दिल्लीत ठणकावून सांगितले की, ‘‘पाकव्याप्त कश्मीर आमचेच आहे. केंद्र सरकारने आदेश दिल्यास पाकव्याप्त कश्मीर ताब्यात घेऊ.’’ जनरल नरवणे यांच्या वक्तव्याचे पडसाद पाकिस्तानात उमटू शकतात, पण असे पडसाद उमटले तरी पाकिस्तान काय करणार? कारण पंतप्रधान मोदी यांच्या सांगण्यानुसार पाकचे डोके ठेचले गेले आहे. जनरल यांनी चुकीचे काहीच सांगितले नाही. पाकव्याप्त कश्मीरमध्येच सर्वाधिक दहशतवादी तळ व प्रशिक्षण केंद्रे आहेत आणि पाकिस्तानचे लष्कर, आयएसआयच्या पाठिंब्याने हे तळ चालवले जात आहेत. मधल्या काळात आपल्याकडून जे काही सर्जिकल स्ट्राइक वगैरे झाले ते याच भागात, पण सर्जिकल स्ट्राइक होऊनही पाकडय़ांचे शेपूट वाकडे ते वाकडेच. त्यांच्या कुरापती काही थांबलेल्या नाहीत. कश्मीर खोऱ्यात आजही आमच्या सैनिकांचे रक्त सांडले जात आहे. रोज बलिदाने होत आहेत, पण कश्मीरचा प्रश्न हा राजकीय किंवा निवडणुकांपुरताच उसळून वर येतो व त्यावर राजकीय भाकऱ्या शेकल्या जातात. हे आता

नित्याचेच झाले

आहे. म्हणूनच जनरल नरवणे यांच्या नव्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. जनरल नरवणे म्हणतात, हिंदुस्थानच्या संसदेनेच फेब्रुवारी 1994 व त्याआधीही असा ठराव केला आहे की, ‘पाकव्याप्त कश्मीरसह संपूर्ण जम्मू-कश्मीर हे हिंदुस्थानचे अविभाज्य अंग आहे. त्यामुळे पाकिस्तानने कश्मीरवरील बेकायदेशीर ताबा सोडून द्यावा.’ संसदेचाच असा ठराव असल्याने केंद्राने आदेश द्यावेत. लष्कर घुसवून पाकड्यांचे कंबरडे मोडून काढू व संपूर्ण कश्मीरचा ताबा घेऊ असे त्यांचे म्हणणे आहे. जनरल नरवणे हे केंद्राकडे लष्करी कारवाईचा आदेश मागत आहेत व पंतप्रधान मोदी यांनी असे आदेश द्यावेत अशी देशभावना आहे. सर्जिकल स्ट्राईकचा बार उडवल्यावर प्रत्येक निवडणूक प्रचार सभेत पंतप्रधान मोदी व भाजपचे सगळेच नेते बुलंद आवाजात सांगत होते, ‘‘देशवासीयांनो, आता पुढचे लक्ष्य पाकव्याप्त कश्मीर आहे बरं का! पाकने घशात घातलेले कश्मीर सोडवून अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण करू!’’ जनरल नरवणे सरकारच्या त्याच भूमिकेची ‘री’ ओढत आहेत. अमित शहा यांनी कश्मीरमधील 370 कलम हटवून क्रांती केली. आता जनरल मनोज नरवणे यांना मोदी-शहा यांचे आदेश मिळताच पाकव्याप्त कश्मीर आपले होईल व

अखंड हिंदुस्थानची पुष्पमाला

वीर सावरकरांना चढवली जाईल. अखंड हिंदुस्थान हे तर वीर सावरकरांचे मोठे स्वप्नच होते. त्यामुळे सावरकरांचादेखील सन्मान होईल. दुसरे असे की, भाजपचे केंद्र सरकार हिमतीचे व हिकमतीचे आहे हे सिद्ध होईल. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील ‘तुकडे-तुकडे गँग’वर त्यांचा रोष आहे. देशाचे तुकडे पाडण्यासंदर्भात घोषणाबाजी करणाऱ्यांच्या विरोधात प्रति घोषणाबाजी करण्यापेक्षा ‘तुकडे-तुकडे’ गँगच्या कानाखाली अखंड हिंदुस्थानच्या नकाशाचा जाळ उठवला पाहिजे व त्यालाच आम्ही देशभक्ती म्हणतो. जनरल नरवणे यांनी त्याच दिशेने पाऊल टाकण्यासाठी केंद्राकडे आदेश मागितले आहेत. हिंदुस्थानचे लष्कर हे संविधानात्मक मूल्यांचे रक्षण करण्यास कटिबद्ध आहे. न्याय, स्वातंत्र्य, समानता व बंधुता या तत्त्वांचे रक्षण करण्यासाठी आमचे लष्कर कटिबद्ध आहे. नैतिकता, नियम व संकेत पाळणे हे आमच्या लष्कराचे कर्तव्यच आहे. पाकिस्तानी लष्कराप्रमाणे घुसखोरी करणे हा आमच्या लष्कराचा पुरुषार्थ नाही. देशाच्या संसदेने केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचा आदेश लष्करप्रमुखांनी मागितला आहे. केंद्र सरकारने आता माघार घेऊ नये. ‘तुकडे तुकडे गँग’ला धडा शिकवण्याचा हाच उत्तम मार्ग आहे!

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *